रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर खेडमधील भरणे नाका परिसरात आज सकाळी झालेल्या दोन अपघातांमध्ये ३७ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे.
भरणे येथे रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खासगी आरामगाडी उलटल्याने झालेल्या अपघातात तीसहून अधिक प्रवासी जखमी झाले. मुंबईतून परळ येथून खेड तालुक्यातील केळणे गावाकडे निघालेल्या या खासगी आरामगाडीच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. बसमधून प्रवास करणाऱ्यांपैकी तीसहून अधिकजण जखमी असून दहाजण गंभीर जखमी झाले. दुसरा अपघात कळंबणी येथे घडला. या अपघातात तवेरा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटल्याने सातजण जखमी झाले. ही मोटार मुंबईहून जयगडकडे निघाली होती. जखमींना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील केळणे गोमळेवाडी येथे असलेल्या लग्नकार्यासाठी मुंबईतील परळ येथून खासगी आरामगाडीने नातेवाईक निघाले होते. मध्यरात्री निघालेली ही गाडी भरणे नाका परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक पोहोचली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या डाव्या बाजूला खड्ड्यात उलटली. अपघातानंतर झालेला जोरदार आवाज आणि प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी धावले. बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेची तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच केळणे गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.
दोन्ही अपघातांमधील जखमी सध्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अपघातात जखमी झालेल्यांची नावे अशी – वनिता महेंद्र गोमले (५८), अविनाश रामचंद्र गोमले (३१), अल्पेश अरुण गोमले (३४), संदीप तुकाराम गोमले (४५), अनंत सिताराम खेराडे (६७), राजाराम धोंडू गोमले (५२), रवींद्र धोंडू साळुंखे (६१), वैजयंती लक्ष्मण गोमले (५५), विठ्ठल धोंडू बोले (५६), लक्ष्मण महादेव गोमले (६६), ओंकार भगवान गोमले (२६), मनोहर सदाशिव गोमले (६२), भावेश बाबू गोमले (१९), अस्मिता सोनू गोमले (५८), बाळकृष्ण तुकाराम गोमले (६४), नितेश मधुकर गोमले (२३), दशरथ राजाराम गोमले (४५), अल्पेश विजय गोमले (२८), दिनेश विजय गोमले (२६), महेंद्र दत्ताराम गोमले (३२), अस्मिता अंकुश गोमले (४५), सदानंद बाबू गोमले (४७).