Monday, January 20, 2025
Homeताज्या घडामोडीसोमय्या कुटुंबीयांचा १०० कोटीचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार

सोमय्या कुटुंबीयांचा १०० कोटीचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार

संजय राऊत यांचा इशारा

मुंबई : किरीट सोमय्या यांच्या कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि अन्य ठिकाणी जवळपास १०० कोटी रुपयांचा ‘टॉयलेट घोटाळा’ करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. आपण लवकरच हा घोटाळा कागदपत्रांसह बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या या युवा प्रतिष्ठानचा कारभार पाहतात. त्यांनी हा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याचे पुरावे आणि अहवाल कुठे आहे, हे सोमय्या कुटुंबीयांनाही माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

किरीट सोमय्या हे विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यामुळे आता त्यांना इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा हक्क राहिलेला नाही. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. किरीट सोमय्या यांचा महाराष्ट्रात दुर्गंध पसरवणारा घोटाळा लवकरच बाहेर येईल. किरीट सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’पासून टॉयलेट घोटाळ्यात पैसे खाल्ले आहेत. १०० कोटींच्या टॉयलेट घोटाळ्यात युवा प्रतिष्ठानकडून खोटी बिलं तयार करून पैसे लाटण्यात आले. आगामी काळात आम्ही किरीट सोमय्या यांचे आणखी काही घोटाळे बाहेर काढणार आहोत. त्यामुळे त्यांना आता खुलासेच बसत द्यावे लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराविषयी कणव असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आयएनएस विक्रांत घोटाळ्यावर काहीतरी बोलले पाहिजे. एरवी फडणवीस आणि भाजप नेत्यांची राष्ट्रभक्ती उचंबळून येत असते. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना १४ ट्विटस केली. त्यांनी एखादं ट्विट आयएनस विक्रांत घोटाळ्याबाबतही करायला हवे होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

किरीट सोमय्या हे आयएनएस विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यामुळे आता त्यांनी दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत. उद्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानत बसून दहशतावादाविरोधात बोलायला लागला तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे का? तशीच गत किरीट सोमय्या यांची झाली आहे. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आता कोणी विश्वास ठेवणार नाही. विक्रांत युद्धनौकेसाठी गोळा केलेला पैसा कुठे गेला, याचे उत्तर सर्वप्रथम किरीट सोमय्या यांनी द्यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -