मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे. मागील दीड वर्ष शाळा, कॉलेज ऑनलाइन परीक्षा घेत होत्या. मग या वर्षीदेखील परीक्षा ऑनलाइन घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र कोरोना महामारी नियंत्रणात आल्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेण्याचे निर्णय उच्च शिक्षण विभागाकडून घेण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणी येऊ नये म्हणून
मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. गेल्या वर्षभरांपासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले असून कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर महाविद्यालय सुरु झाले. मात्र वर्षभर ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ऑफलाइन परीक्षा कशाला असा सवाल उपस्थित करत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली आहेत. बुधवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूंच्या झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यत आला आहे. ऑफलाइन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा जास्तीचा वेळ फक्त उन्हाळी (मार्च/ एप्रिल) २०२२ या परीक्षेपुरता असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. आज झालेल्या कुलगुरूंच्या बैठकीत ऑफलाइन परीक्षांसाठी प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये होणाऱ्या ऑफलाइन प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेसाठी वेळ वाढविण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून या काळात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आणला. त्याप्रमाणे शिक्षण सुरूही झाले; परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू असताना त्यामध्ये लिखाणाचा सराव होत नव्हता. गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हातातील पेनाची जागा कम्प्युटर किंवा मोबाइलने घेतली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.