पालघर (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमीनींचे जी.आय.एस. आधारित सर्वेक्षण व भू-मापन करण्याबाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व भारतीय सर्वेक्षण विभाग, भारत सरकार यांच्या संयुक्त सहभागाने राबवण्यास महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग शासनातर्फे मान्यता देण्यात आली आहे. ड्रोनद्वारे गावठाण भू-मापन हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी व जनताभिमुख प्रकल्प असून सदर प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अचूक व जलद गतीने मोजणी काम होणार आहे.
ड्रोनद्वारे गावठाण भू-मापन योजनेमुळे गावठाणातील मालमत्तांचे जी.आय.एस. आधारित रेखांकन व मूल्यांकन करण्यात येणार असून गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना नगर भू-मापन क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार गावठाणातील प्रत्येक मिळकतींच्या मिळकत पत्रिका तयार केल्या जाणार असून त्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सदर योजनेमुळे गावातील ग्रामपंचायतींचे व शासनाचे एसेट रजिस्टर तयार करण्यात येणार आहे.
महास्वामित्व ड्रोन गावठाण योजनेमुळे शासनाच्या मिळकतींचे संरक्षण होणार असून ग्रामस्थांना त्यांच्या मालकी हक्काचा नकाशा व अभिलेख मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड मिळण्यास मदत होणार आहे. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे ग्रामस्थांना घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होणार असून मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता आल्यामुळे गावाची आर्थिक पत उंचवण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन करणे यासाठी अचूक अभिलेख व नकाशा उपलब्ध होणेस सदर योजनेमुळे मदत होणार आहे.
सदर योजना ही ग्रामविकास विभाग, भूमिअभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग यांचे संयुक्त सहभागाने राबवण्यात येत असून सदर योजनेच्या यशस्वी होण्यासाठी ग्रामसहभाग व जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.
एकूण ७७० गावे उपलब्ध
महास्वामित्व योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये ड्रोन सर्वेक्षणासाठी एकूण ७७० गावे उपलब्ध असून त्यापैकी वसई तालुक्यातील ४५ गावांचे ड्रोन फ्लाइंग गेल्या महिन्यामध्ये पूर्ण झाले आहे. तथापि, पुढील काम प्रगतिपथावर आहे. पालघरच्या भूमिअभिलेख उपअधीक्षकांनी त्यांच्याकडील १२४ गावांचा ड्रोन फ्लाइंग कार्यक्रम निश्चित केला आहे. सदर दौरा कार्यक्रमानुसार भारतीय सर्वेक्षण विभागाकडून या १२४ गावांमध्ये ड्रोन फ्लाइंग करण्यात येईल. जनतेने याबाबत भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्याकडील प्रतिनिधींना व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन भूमी अभिलेख, जिल्हा अधीक्षक महेश इंगळे यांनी केले आहे.