मुंबई : जेम्स लेनच्या छ्त्रपती शिवाज महाराजांवरील ‘त्या’ वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एक पत्र ऑक्सफर्ड प्रकाशनाला लिहिले होते. हे पत्र मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांसमोर आणले आहे. यावरुन पवारांना हे पत्र आणि पुरंदरेंची भूमिका माहिती नव्हती का? असा सवाल आता मनसेने विचारला आहे.
ठाण्यातील उत्तर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख करत शरद पवारांवर जातीयवादाला खतपाणी घातल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या या आरोपाला काल पवारांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. यामध्ये त्यांनी जेम्स लेनला पुस्तक लिहायला बाबासाहेब पुरंदरेंनी मदत केल्याच्या कथित आरोपाचे समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर मनसेने आज पुरंदरेंचे हे पत्र समोर आणत पुरंदरेंवरील आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.
संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, “नोव्हेंबर २००३ मध्ये पुरंदरेंनी दिल्लीतील ऑक्सफर्ड प्रकाशनाला हे पत्र लिहिले होते. या पत्रावर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह सहा मान्यवरांच्या सह्या आहेत. यामध्ये निनाद बेडेकर, डॉ. वसंतराव मोरे, डॉ. जी. बी. मेहेंदळे, डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. जयसिंग पवार आणि तत्काळीन खासदार प्रदीप रावत यांच्या सह्या आहेत”
या पत्रात सह्या करणारे सर्वजण म्हणतात, “आम्ही प्रत्येकाच्या मतांचा आदर करतो. पण आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवत असलो तरी कुणाचे चारित्र्य मलीन करणे आम्हाला मान्य नाही. जी व्यक्ती कोट्यवधी लोकांचे प्रेरणास्थान आहे, अशा व्यक्तीमत्वावर शिंतोडे उडवणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे जेम्स लेनच्या पुस्तकातील ९३ व्या पानावर लिहीलेला दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा मजकूर तथ्यहीन आहे. हा मजकूर केवळ जेम्स लेनचा कल्पनाविलास आहे. लेखक आणि प्रकाशकाने मजकूर मागे घेऊन २५ नोव्हेंबरपर्यंत भारतीयांची माफी मागावी आणि पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. प्रकाशक आणि लेखकाने हे पुस्तक मागे न घेतल्यास आम्ही भारत सरकारकडे कायदेशीर कारवाईची मागणी करु”
२००३ मध्ये शरद पवार हे सत्तेत होते, तेव्हा त्यांना हे पत्र माहिती नव्हते का? असा सवाल करत देशपांडे म्हणतात, “कारण राज ठाकरेंनी म्हटले होते की, १९९९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जातीजातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. तो कसा केला त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. पुरंदरेंनी अशी पत्र लिहून निषेध व्यक्त करुन त्यावर बंदी आणण्याची मागणी केली. यावरुन त्यांनी त्यांना अशी कोणतीही माहिती दिली नसल्याचे स्पष्ट होते. तरीही पुरंदरेंना सॉफ्ट टार्गेट करण्यात आले.”