नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरात दिवसेंदिवस वाहन पार्किंगचा प्रश्न उग्ररूप धारण करत आहे. उपलब्ध असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने अवजड वाहने कशी चालवावीत, असा प्रश्न चालकांना पडला आहे. त्यात अवैध फेरीवाल्यांचा उच्छाद देखील कारणीभूत ठरत आहे. त्याचबरोबर रिक्षावाल्यांचा त्रास देखील त्यांना सहन करावा लागत आहे. यामुळे वाहनचालकांची अवजड वाहने चालवताना कसोटी लागत आहे. यावर संबंधित प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून त्रासातून मुक्ती द्यावी, अशी मागणी चालक करत आहेत. दरम्यान, या कारणामुळे मनपाच्या परिवहन उपक्रमातील मार्गात बदल करण्यात आले आहेत.
नवी मुंबई शहरात नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. सिडकोच्या रिक्त असलेल्या भूखंडावर बांधल्या जात असलेल्या इमारती व अवैध प्रकारे बांधल्या जाणाऱ्या इमारतीमुळे नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिडकोच्या भूखंडवार अधिकृतपणे बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये किमान वाहन पार्किंगची व्यवस्था केली जाते. पण दुसरीकडे अवैध बांधकामात अपेक्षित वाहन पार्किंगची व्यवस्था केली जात नसल्याने तेथील सदनिकाधारक आपली वाहने मिळेल त्या जागेवर उभी करण्यात धन्यता मानत आहेत, तर कामानिमित्त आलेले वाहनचालक शहरात मिळेल त्या जागेवर आपली वाहने उभी करत असल्याने वाहनांची गर्दी नेहमीच मुख्य रस्त्यावर दिसून येत आहे.
तसेच सायंकाळी अवैध फेरीवाले गर्दी मोठ्या प्रमाणात करत असल्याने त्याचाही परिणाम अवजड वाहनांना मार्गक्रमण करताना दिसून येत आहे. नवी मुंबईत ज्या प्रकारे नागरीकरण, नवनवीन रस्त्यांची बांधणी होते. त्याप्रमाणे रिक्षा स्टँड तयार करणे अत्यंत गरजेचे होते. पण रिक्षा स्टँडची निर्मिती न केल्याने रिक्षाचालक व्यवसाय करताना कुठेही रिक्षा उभी करतात. बऱ्याच ठिकाणी ज्या जागेवर व्यवसाय होतो, यामुळे देखील एनएमएमटी, बेस्ट, ट्रक, टेम्पोचालकांना कमालीचा त्रास होताना दिसून येत आहे. यावर उपाय शोधणे काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे.
अतिक्रमण विभागाकडून नेहमीच अवैध पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. यापुढेही केली जाईल.
– रोहित ठाकरे, अभियंता, पालिका
आमच्याकडून वाहतुकीस अडथळा येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी संबंधित प्रशासनाला कळविले जात आहे.
– अनिल शिंदे, वाहतूक अधीक्षक, परिवहन उपक्रम