मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईची तुंबई होते; मात्र यावर्षी लोकप्रतिनिधीही नसल्याने नालेसफाईकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान नालेसफाईबाबत भाजप आक्रमक झाली असून नालेसफाईच्या कामाचा अहवाल भाजपने सादर केला आहे. मुंबईत नाल्यांची स्थिती भयावह झाली असल्याचे पत्र भाजपने पालिका प्रशासक आणि आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले आहे.
भाजपने मुंबई शहर व उपनगरात दि. ७ ते १३ एप्रिल २०२२ या कालावधीत नाले सफाई पाहणी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन केले होते. यात भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते. या पाहणी दरम्यान नालेसफाईच्या कामाचा अहवाल भाजपने मांडला आहे. त्यात विशेष म्हणजे एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतरही नालेसफाईचे केवळ १० टक्केच काम सुरू झालेले आहे, तर यावर्षी नालेसफाईच्या कामास दीड महिना उशीर झालेला आहे. गजधरबांध नाला, माहूल नाला येथे माणसे नाल्यावर चालत असल्याची दृश्य पाहावयास मिळाली. तर सर्वच नाले हे कचरा, प्लास्टिक, माती, दगड - विटा आणि गाळ यांनी पूर्णपणे भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले असून ज्या तुरळक ठिकाणी नालेसफाई सुरू होती तेथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते.
तेथे निरीक्षण करण्यासाठी महापालिकेचे कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते. इतकेच नव्हे तर कंत्राटदाराचा मुकादम सुद्धा उपस्थित नव्हता. गाळ वाहून नेण्यासाठी यंत्रणेची कुठलीही माहिती उपलब्ध झाली नाही, तर नाल्यातील गाळाचे मोजमाप, वजन कशा प्रकारे केले जाणार आहे आणि कंत्राटदारास देयकाचे अधिदान कशाच्या आधारावर केले जाणार आहे याबाबत पारदर्शकता देखील आढळली नाही. त्याचबरोबर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नालेसफाईचा परिमाण ५० टक्क्यांनी कमी असून नालेसफाई दीड महिना उशिरा सुरू झाली आहे. पण कंत्राट रक्कमेत रु.३२ कोटींची वाढ असल्याचे दिसून आले, तसेच सायन कोळीवाडा येथील जे. के. केमिकल नाल्यालगतच्या केमिकल उद्योगांचे रासायनिक पाणी तसेच नाल्यालगतच्या सिमेंट प्लांटचे पाणी, वाया गेलेल्या सिमेंटचा गाळ हा नाल्यात सोडला जातो. त्यामुळे नाल्याचा प्रवाह मार्ग अरुंद झालेला आहे.
यामुळे शिव गांधी मार्केट परिसर पूरग्रस्त होतो, तर नाल्याप्रमाणेच मिठी नदी, वाळभट्ट नदी, ओशिवरा नदी, पोयसर नदी, दहिसर नदी यांच्या पात्रातील गाळ, अडथळे व अतिक्रमणे पावसाळ्यापूर्वी काढणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. भांडुप पूर्व एपीआय नाला येथे नाल्याच्या प्रवाहपात्रात महापालिकेचे बांधकाम असून यामुळे नाल्याचे अर्धे पात्र बंद करण्यात आले आहे. उर्वरित पात्रात नलिका पेटिका टाकून पर्यायी तात्पुरता मार्ग बनविण्याचे काम अर्धवट झाले आहे. त्यामुळे नाल्याचे ६० टक्के पात्र बंद झाले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे संपूर्ण भांडुप परिसर पावसाळ्यात पाण्याखाली जाणार आहे. हे विषय भाजपने पाहणी दौऱ्यात मांडले आहेत.