तलासरी: तलासरी तालुक्यातील कवाडा लिलकपाडा येथील १५ वर्षीय शाळकरी मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. कवाडा लिलकपाडा येथील झीना विनोद पाहू (वय १५ वर्षे) हिने मंगळवारी सकाळी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. झीनाची आई सकाळी कामाला गेली होती. घरात कोण नाही हे पाहून तिने गळफास घेतला.
शासकीय आश्रमशाळा सवणेमध्ये इयत्ता १० वीत ती शिकत होती. तिने नुकतीच दहावीची परीक्षा देऊन ती घरीच होती. गळफास घेतल्याचे लक्षात येताच तिला त्वरित तलासरी ग्रामीण रुग्णालयात आणले. पण दाखल होण्यापूर्वीच ती मयत झाली होती. याबाबत अधिक तपास तलासरी पोलीस करीत आहेत.
शासकीय आश्रम शाळा सवणेमधील एका मुलाने सहा महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनतर झिनाने आत्महत्या केल्याने ही दुसरी घटना घडली. तलासरी तालुक्यात अल्पवयीन मुलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याने आदिवासी विकास प्रकल्पाने शाळकरी मुलांसाठी मार्गदर्शन शिबीर लावणे गरजेचे झाले आहे.