विक्रमगड (वार्ताहर) : विक्रमगड तालुक्यामधील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अपात्र घरकुल यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उद्दिष्ट होते त्यापैकी ‘ड’ सर्वेक्षणामध्ये अनेक जाचक अटी व शर्ती आणि गरजू लोकांना डावळून सर्वेक्षण करण्यात आले व पात्र लाभार्थी निकषात बसत असूनही काहींची नावे सर्वेक्षणातून गायब झाली आहेत. तरी जी गरजू आणि पात्र तिच्या सर्व निकषांमध्ये बसतात, असे गरजू-गरीब पक्क्या घरापासून अपात्र ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम प्रशासनाने केले आहे.
धनदांडग्यांना या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे अनेक प्रकरणे बाहेर आली होती. या आणि अशा अनेक घरकुलांच्या प्रश्नांवर गरजूंना घरकुले मिळाली पाहिजे व अपात्र लोकांचे पुन्हा सर्वेक्षण झाले पाहिजे, यासाठी कॉ. किरण गहला यांनी मागणी केली आहे. अजूनही अनेक पंचायतीने आपल्या ‘ड’ याद्या सबमिट केलेल्या नाहीत. प्रत्येकाला घरकुल मिळाले पाहिजे, यासाठी शासनाने काही निकष लावून दिलेले आहेत; परंतु या निकषाप्रमाणे यांना घरकुल मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
परिपत्रकाप्रमाणे बेघर, विधवा, अपंग यांना प्राधान्याने घरकुल मिळाले पाहिजे असतानाही अनेक लाभार्थी या घरकुलापासून वंचित आहेत. तरी या प्राधान्याने या व्यक्तींचा समाविष्ट करावा, अशी मागणी किरण गहला यांनी केली आहे.
तरी याबाबत प्रशासनाने व ग्रामपंचायतीने घरकुलांच्या संदर्भात योग्य पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे. तसेच येणाऱ्या दिवसांत घरकुलांच्या संदर्भात योग्य ते सारे निकष लावूनच घरकुले मंजूर करावीत, अशी मागणी केली आहे. जेणेकरून खरोखर गरजू या योजनेपासून वंचित राहणार नाहीत व त्यांना हक्काचे घर मिळेल.