नवी मुंबई (प्रतिनिधी) : चार सामन्यांपैकी ३ सामन्यांत विजय मिळविणाऱ्या गुजरातसमोर गुरुवारी राजस्थानचे आव्हान आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. राजस्थाननेही चारपैकी तीन सामने जिंकले असून बुधवारी हा संघ क्रमवारीत अव्वल स्थानी होता. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या चौथ्या विजयासाठी उत्सुक आहेत. दोन्ही संघांच्या खात्यात ६ गुण आहेत.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नवख्या गुजरातने पहिले तिन्ही सामने जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र गुजरातची विजयी घोडदौड हैदराबादने रोखली. गुरुवारी गुजरातसमोर राजस्थानचे आव्हान आहे. शुभमन गील सध्या चांगलाच फॉर्मात आहे. शिवाय वेड, विजय शंकर, हार्दीक पंड्या, डेवीड मीलर, राहुल तेवतीया,
साई सुदर्शन अशा तगड्या फलंदाजांची मोट गुजरातच्या ताफ्यात आहे. हे फलंदाज धावा काढण्यात आणि मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात राहुल तेवतीयाने शेवटच्या दोन्ही चेंडूंवर षटकार लगावत गुजरातला धक्कादायक विजय मिळवून दिला. राशीद खानने आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी केली आहे; तर मोहम्मद शमी आणि हार्दीक पंड्यानेही चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे गुजरातचा संघ दोन्ही आघाड्यांवर सरस ठरला आहे. दुसरीकडे हैदराबाद आणि मुंबईला पराभूत करून राजस्थानने यंदाच्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली.
बंगळूरुने राजस्थानला नमवून त्यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखली. जोस बटलरने यंदाच्या हंगामात चांगलीच कामगिरी केली आहे. त्याने मुंबईविरुद्ध शतक झळकावले आहे. कर्णधार संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर यांनी फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. त्यामुळे राजस्थानची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, रवीचंद्रन अश्वीन, युजवेंद्र चहल यांनी चांगली कामगिरी करण्यात यश आलेले आहे.
वेळ : रात्री ७.३० वाजता. ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम.