मुरुड (वार्ताहर) : मुरुड स्वारगेट एसटी बसला रेवदंडा अलिबाग मार्गावर श्री शारदा पेट्रोल पंपाजवळ जे. एस. डब्ल्यू. कंपनीच्या बसने समोरासमोर धडक दिली. या अपघातात ५०हून अधिक प्रवासी जखमी झाले. एसटी बसचालक गंभीर जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच काही जखमी रुग्णांना तत्काळ ग्रामीण व काही रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुरुड आगारातून सकाळी ७ वाजता सुटणारी मुरुड अलिबाग-स्वारगेट या एसटी बसला अलिबाग तालुक्यातील बागमळा येथील श्री शारदा पेट्रोल पंपाजवळ जेएसडब्ल्यूची बस समोरासमोर धडक झाली. यामध्ये बसमधील ५०हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त हाती येत आहे. जखमींना जिल्हा रुग्णालय अलिबाग व संजीवनी हॉटेलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, सकाळच्या सुमारास रेवदंडा अलिबाग मार्गवर इतका मोठा भीषण अपघात झाल्याने काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती.