पालघर (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. काल प्रभाग समिती ‘फ’ अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने प्र. सहा. आयुक्त रूपाली संख्ये यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हद्दीतील अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. गेल्या आठवड्यापासून या प्रभाग समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे या भागातील चाळमाफियांची पळापळ सुरू झाली आहे. या मोहिमेचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून ही मोहीम अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेले महानगरपालिका हद्दीतील पेल्हार, हे गाव अनधिकृत बांधकामांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यापूर्वी प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे या भागात चाळमाफियांचे चांगलेच फावले होते. त्यामुळे या भागात दिवसागणिक शेकडो अनधिकृत बांधकामे उभी राहत होती. पण तीन महिन्यांपूर्वी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या अनिलकुमार पवार यांनी मनपा हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले व अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली.
काल प्र. सहा. आयुक्त रूपाली संख्ये व कनिष्ठ अभियंता हितेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बिलालपाडा येथील श्री हरी इंडस्ट्रीज येथील २५०० चौरस फुटांचे वाढीव बांधकाम, वरुण इंडस्ट्रियल येथील ६००० चौरस फूट वाढीव वीट बांधकाम, नवजीवन पाटील वाडी येथील २००० चौरस फूट (दोन खोल्या), श्री रामनगर येथे २५०० चौरस फूट जमीनदोस्त केले.
त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या समाजकंटकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. यापुढेही सदर मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे महानगरपालिका सूत्रांनी सांगितले.