
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीमधील आरओबी, रस्ता दुरुस्ती, गटर्स, पाइपलाइन, स्वच्छता तसेच इतर कामांची बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करून या परिसरातील सर्व कामे तातडीने वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले.
यावेळी प्रस्तावित शिळ - दिवा रस्त्यामधील गळती थांबविणे, पाण्याची लाइन टाकणे, दिवा चौकात श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जागा अधिग्रहित करण्याबाबत बैठक आयोजित करणे, दिवा आर.ओ.बी बांधकामामध्ये येणाऱ्या ओव्हरहेड विद्युत वाहिन्या स्थलांतरित करणे, दिवा आरओबीमध्ये बाधित होणाऱ्या बांधकाम निष्कासनाकरिता आवश्यक उपाययोजना करणे तसेच दिवा आरओबी व विविध ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे खालून प्रस्तावित नळ जोडण्यासंबंधी विविध मुद्द्यांबाबत डी.आर.एम मध्य रेल्वे यांचे स्तरावर बैठक आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यास माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक शैलेश पाटील, दीपक जाधव, अमर पाटील, माजी नगरसेविका अंकिता पाटील, दीपाली भगत, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपआयुक्त मारुती खोडके, उपआयुक्त मनीष जोशी, उपआयुक्त जी. जी. गोदेपुरे, संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.