Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक : राज्यपाल

शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक : राज्यपाल

मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. १४) चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.


कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर, राज्यमंत्री विश्वजित कदम, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले असे सांगताना त्यांनी दिलेली शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केले.


राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह यांसारख्या क्रांतिकारकांनी क्रांतीच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यसाठी प्रयत्न केले; तर महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा लढा दिला. सरदार पटेल यांनी देशातील संस्थानांच्या विलीनीकरणातून देश एक केला, तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण समाजाला संविधानाच्या माध्यमातून समतेच्या सूत्रात गोवण्याचे काम केले, असे राज्यपालांनी सांगितले.


डॉ आंबेडकर हे घटनाकार, लेखक, पत्रकार असे बहुविध प्रतिभेचे धनी होते. त्यांनी देशाला सर्वोत्कृष्ट असे संविधान दिले व देशातील गरीब, वंचित व उपेक्षितांना लढण्याचे बळ दिले असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. डॉ आंबेडकर यांचे भव्य स्मारक निर्माण करण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यपालांच्या हस्ते यावेळी भिख्खूसंघाला चिवरदान (पवित्र वस्त्र दान) करण्यात आले. डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments
Add Comment