Wednesday, July 17, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरइंजेक्शनसाठी लाच मागणारा डॉक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात

इंजेक्शनसाठी लाच मागणारा डॉक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात

बोईसर (वार्ताहर) : एका रुग्ण महिलेकडून सरकारी इंजेक्शनच्या बदल्यात पाचशे रुपयांची लाच मागणाऱ्या तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. शरद गायकवाड याच्या अँटी करप्शन ब्युरोच्या पालघर पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.

डॉ. शरद गायकवाड यांनी मोफत व शासकीय औषधासाठी ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई केली गेली. तक्रारदार यांच्या पत्नीची बहीण तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्ण म्हणून उपचार घेत आहे. त्यांना आवश्यक असलेले इंजेक्शन (आयर्न सुक्रोज) प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असतानाही गायकवाड यांनी त्यांच्याकडून हे मोफत इंजेक्शन देण्यासाठी पाचशे रुपये प्रति इंजेक्शन लाच मागितली. तसेच लाच दिल्याशिवाय उपचार करणार नाही, असे सांगितले. आवश्यक असलेल्या पाच इंजेक्शनपैकी या आधी तीन इंजेक्शनचे एक हजार ५०० रुपये गायकवाड याने आधीच घेतलेले आहेत. त्यानंतर उर्वरित दोन इंजेक्शनसाठी प्रत्येकी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली.

या प्रकारानंतर त्रस्त झालेले तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाच्या पालघर पथकाकडे तक्रार दिली. तक्रारीत पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलीस हवालदार संजय सुतार, नवनाथ भगत, स्वाती तारवी यांनी सापळा रचला व पाचशे रुपयांची लाच घेताना डॉ. शरद गायकवाड याला रंगेहात पकडले. गायकवाड यांच्याविरोधात तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -