Sunday, January 19, 2025
Homeकोकणरायगडपाली बस स्थानकाच्या बांधकामास दिरंगाई

पाली बस स्थानकाच्या बांधकामास दिरंगाई

सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांचा उपोषणाचा इशारा

गौसखान पठाण

सुधागड-पाली : पालीतील बसस्थानकाची जुनी इमारत तोडून एक वर्ष उलटून गेले तरीही नवीन इमारत अजूनही बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील प्रवासी व कर्मचारी यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. बसस्थानकाच्या बांधकामात होणाऱ्या दिरंगाईबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ सोमवारी (ता. १८) पाली बस स्थानक आवारात आमरण उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रायगड, परिवहन विभाग पेण व संबंधित प्रशासनाला नुकतेच दिले आहे.

या निवेदनात रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी सांगितले आहे की, पाली बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत सन २०१६, सन २०१८ आणि सन २०२१ रोजी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी त्यांना संबंधित कार्यालयाकडून पाली बसस्थानक लवकर बांधून पूर्ण करण्यात येईल, याबाबत लेखी पत्राद्वारे आश्वासित केले गेले होते. या विनंतीला मान देऊन ओव्हाळ यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले होते.

मागील वर्षी २५ मार्च रोजी उपोषणाबाबतच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत संबंधित प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर ओव्हाळ यांनी उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर बसस्थानकाची धोकादायक इमारत तोडण्यात आली आणि स्थानक आवारात तात्पुरत्या स्वरूपाची निवारा शेड बांधण्यात आली. मात्र, त्यानंतर एक वर्ष उलटून गेली तरी आजतागायत परिवहन महामंडळ अथवा कंत्राटदाराकडून तेथे कोणत्याही स्वरूपाचे काम सुरू करण्यात आलेले नाही.

यासंदर्भात आम्ही वरिष्ठ स्तरावर पत्राद्वारे पाठपुरावा करत आहोत. – अनघा बारटक्के,विभाग नियंत्रक, परिवहन महामंड, पेण-रायगड

समस्यांचा डोंगर

जुन्या इमारतीचे डेब्रिज तेथे तसेच पडले आहे. नाल्याचा स्लॅब तुटलेला आहे. शौचालय बंद आहे. स्थानक आवारात सांडपाणी व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. म्हणूनच या गंभीर बाबीची दखल घेऊन ताबडतोब स्थानक दुरुस्त करून नवीन इमारत बांधकाम सुरू करावे. अन्यथा, आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -