
पुणे (वृत्तसंस्था) : डेवाल्ड ब्रेवीस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रोहित शर्मा यांनी पंजाबविरुद्धच्या सामन्यात सांघिक कामगिरी करत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण मोक्याच्या क्षणी सेट झालेल्या फलंदाजांनी खाल्लेली कच मुंबईला भारी पडली आणि त्यामुळे यंदाच्या हंगामातील सलग पाचवा पराभव मुंबईने पत्करला. मयांक अगरवाल आणि शिखर धवन यांची धडाकेबाज फलंदाजी आणि शेवटच्या षटकांत केलेली प्रभावी गोलंदाजी या जोरावर पंजाबने मुंबईविरुद्ध विजय खेचून आणला.

मुंबईच्या फलंदाजीची सुरुवात तशी बरी झाली. ३ षटकांत मुंबईने ३० च्या जवळपास धावा केल्या. पण विकेट टिकविणे त्यांना जमले नाही. रोहित एका बाजूने फटकेबाजी करत होता तर इशन किशन संयम बाळगून होता. तेवढ्यात रोहितचा संयम तुटला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. रबाडाच्या उडत्या चेंडूवर चुकीचा फटका खेळत अरोराकडे झेल देत रोहित बाद झाला. रोहितने १७ चेंडूंत २८ धावांची झटपट खेळी केली. त्यानंतर इशन किशनही फार काळ टिकला नाही. ६ चेंडूंत अवघ्या ३ धावा करत इशन किशन तंबूत परतला. डेवाल्ड ब्रेवीस आणि तिलक वर्मा यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. दोघांनीही पंजाबच्या गोलंदाजांना धु धु धुतले. ब्रेवीसने ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूंत ४९ धावा केल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असतानाच तो बाद झाला. तिलक वर्माने २० चेंडूंत ३६ धावांचे योगदान दिले.
पोलार्ड ११ चेंडूंत १० धावा करून धावचीत होत माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमारने फटकेबाजी करत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण त्यालाही सामन्याचा शेवट करता आला नाही. सूर्यकुमारने ३० चेंडूंत ४३ धावांचे योगदान दिले. शेवटी मुंबईच्या विजयाचे स्वप्न या सामन्यातही भंगले. पंजाबविरुद्धच्या पराभवाने यंदाच्या मोसमातील मुंबईचा सलग पाचवा पराभव झाला. त्यामुळे पाच सामन्यांनंतर मुंबईच्या गुणफलकाची पाटी कोरीच आहे.
तत्पूर्वी मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाबची सुरूवात दणक्यात झाली. कर्णधार मयांक अगरवाल आणि शिखर धवन यांनी पंजाबला धडाकेबाज सुरुवात करून दिली. दोघांनीही मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मुरुगन अश्वीनने मयांकचा अडथळा दूर करून मुंबईला पहिला बळी मिळवून दिला. मयांकने ३२ चेंडूंत ५२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि लिएम लिविंगस्टोन यांना फार काळ मैदानात टिकता आले नाही.
सलामीवीर शिखर धवनने एका बाजूला टिकून राहून संघाची धावसंख्या खेळती ठेवली. शेवटच्या काही षटकांमध्ये यष्टीरक्षक जितेश शर्मा आणि एम शाहरुख खानने प्रभावी फलंदाजी केली. जितेश शर्माने २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १५ चेंडूंत नाबाद ३० धावा केल्या. तर एम शाहरुख खानने २ षटकार लगावत ६ चेंडूंत १५ धावा केल्या. २० षटकांअखेर पंजाबने १९८ धावांचा डोंगर उभा केला. मुंबईच्या जसप्रीत बुमराने चांगली गोलंदाजी केली. त्याने धावाही कमी दिल्या आणि एक विकेटही मिळवली. बुमराने ४ षटकांत २८ धावा देत १ बळी मिळवला. मुंबईच्या अन्य गोलंदाजांना धावा काढण्यात पंजाबच्या फलंदाजांना यश आले.