नवी मुंबई (प्रतिनिधी) : घणसोली परिसरात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले; परंतु रस्त्यावर काँक्रीट आल्याने फिडर पिलर व रस्त्याचे अंतर कमी राहिले. यामुळे ज्या परिसरात पावसाळ्यात पाणी भरते. त्या ठिकाणातील फिडर पिलरमध्ये पाणी घुसू शकते. जर फिडर पिलरमध्ये पाणी घुसले, तर विद्युत प्रवाह नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे मानवी हानी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे सावट असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले फिडर पिलर योग्यच होते, अशी माहिती स्थानिक नागरिक देत आहेत. २०१२ मध्ये घणसोलीत भूमिगत विद्युत वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या. त्यावेळी घराघरांत विद्युत जोडण्यासाठी फिडर पिलर उभारण्यात आले; परंतु काळाच्या ओघात पालिकेकडून ररस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले.
पण काँक्रिटीकरण करताना कोणतेही भान अभियांत्रिकी विभागाकडून ठेवले गेले नाही. त्यामुळे चाळी परिसरात काँक्रीट घरांच्या उंबरठ्यावर गेले. तसेच फिडर पिलरच्या पायथ्यापर्यंत पोहोचले. यामुळे खोलगट भागात पवसाळ्यात पाणी साचत असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
फिडर पिलरचा काहीही दोष नाही. जेव्हा ते बसविले ते योग्यच होते. पण, त्यानंतर मनपाकडून काँक्रिटीकरण केले. ते अयोग्य आहे. टाकण्यात आलेले काँक्रिटीकरण उखडून टाका. याविषयी मी पालिकेला मागील वर्षी निवेदनही दिले. पण त्यावर अजून तरी काही उपाययोजना करण्यात आली नाही.– दिलीप व्यव्हारे, उपाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई