मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होत आहे. सांप्रदायिक विचारांची मांडणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्य सरकार गंभीरतेने विचार करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांच्या मंगळवारच्या भाषणात भारतीय जनता पक्षाबद्दल एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला. महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत त्यावर एक शब्दही बोलत नाही, म्हणजे काय समजायचं? असा सवाल त्यांनी केला. मला नास्तिक म्हणता, परंतु मी तुमच्यासारखे देवधर्माचे प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणुकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा… एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे. त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे.
प्रबोधनकारांनी देवधर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टिका केली. गैरफायदा घेणाऱ्याला ठोकून काढण्याचे काम केले. आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो. मात्र कुटुंबातील वाचतात असे नसावे असा टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मी नाव घेत नाही, असा उल्लेख ठाकरे यांनी केला. पण अमरावतीत केलेले माझे भाषण ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास २५ मिनिटे बोललो. फुले-शाहू-आंबेडकरांबाबतही उल्लेख केला जातो त्याचा मला अभिमान आहे. या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे असेही पवार म्हणाले.
पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना माँ जिजाऊंनी छत्रपतींचे व्यक्तिमत्व घडवले असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले असा उल्लेख केला होता. त्याला माझा सक्त विरोध होता, असेही ते म्हणाले.