
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विरोधकांच्या टिकेनंतरही ‘वर्क फ्रॉम होम’चा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्बल दोन वर्षांनंतर बुधवारी मंत्रालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातल्या काही विभागांना भेटी दिल्या तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ई टपाल, पेपरलेस कामकाज प्रणालीविषयी सूचना केल्या व अडचणी विचारल्या. यावेळी कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना एका दिव्यांग कर्मचाऱ्याची छायाचित्र घेण्याची इच्छा पूर्ण केली.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुले वाहून अभिवादन केले. पुराभिलेख संचालनालयातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाच्या तयारीची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली. हे प्रदर्शन कायमस्वरूपी इंदू मिल येथील स्मारकस्थळीपण लावा अशी सूचना त्यांनी करून मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील बाबासाहेबांचा दस्तावेज तसेच पत्रे, जुनी छायाचित्रे यांची उत्सुकतेने पाहणी केली व सूचनाही केली.
त्रिमूर्ती प्रांगणातील प्रदर्शनाची तयारी पाहून मुख्यमंत्री प्रथम मंत्रालयातील विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांना भेटले. यानंतर मुख्यमंत्री महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, विधि व न्याय अशा विभागात प्रत्यक्ष आतमधून फिरले.