
पुणे (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामातील २३व्या लढतीत बुधवारी (१३ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. सलग चार पराभवांची नामुष्की ओढवलेल्या रोहित शर्मा आणि कंपनीला मयांक अगरवाल आणि सहकाऱ्यांविरुद्ध सूर गवसेल का, याची उत्सुकता आहे.
दिल्ली असो किंवा राजस्थान, कोलकाता आणि बंगळूरुविरुद्ध मुंबईला प्रतिस्पर्ध्यांकडून मात खावी लागली. त्यामुळे चार सामन्यांनंतरही माजी विजेत्यांना पहिल्या विजयासह खाते उघडण्याची प्रतीक्षा आहे. पंजाबची कामगिरी संमिश्र आहे. चार सामन्यांत त्यांनी दोन विजय मिळवले तरी तितकेच पराभवही झाले. बंगळूरुला हरवून नव्या हंगामाची दिमाखदार सुरुवात केली तरी कोलकाताविरुद्ध मात खावी लागली. गतविजेता चेन्नईला हरवण्याची हिंमत दाखवली तरी गुजरात टायटन्सकडून पराभव पाहावा लागला.
दमदार पुनरागमन केलेला सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनने प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावली तरी मुंबईची फलंदाजी मजबूत नाही. तिसरे अर्धशतक तिलक वर्माचे आहे. कर्णधार रोहित शर्मासह अष्टपैलू कीरॉन पोलार्ड या अनुभवींसह ब्रेविस सॅम्स यांना अद्याप सूर गवसलेला नाही. गोलंदाजीतही आलबेल नाही. चार सामन्यांनंतर सर्वाधिक ६ विकेट टायमल मिल्सच्या नावावर आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराही निष्प्रभ ठरला आहे. टायमल मिल्सने थोडा प्रभाव पाडला आहे.
त्यामुळे सर्व आघाड्यांवर खेळ उंचावला तरच मुंबईला पहिल्या विजयाची आशा धरता येईल. पंजाबकडून फलंदाजीत लिव्हिंगस्टोनने दोन हाफसेंच्युरी मारल्यात. त्यानंतर एकाही बॅटरला अर्धशतकी मजल मारता आलेली नाही. कर्णधार मयांक अगरवाल, शिखर धवन असे सर्व टॉपचे फलंदाज अपयशी ठरलेत. गोलंदाजीत राहुल चहरने थोडा प्रभाव पाडला आहे. मात्र, वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा, संदीप शर्माने निराशा केली आहे. मुंबईप्रमाणे पंजाबलाही विजयाची गरज आहे. मात्र, त्यांना ऑलराउंड परफॉर्मन्स करावा लागेल.
वेळ : रा. ७.३० वा.