Friday, May 9, 2025

महामुंबई

पालिकेत प्रशासक असताना राजकीय लुडबुड कशाला?

पालिकेत प्रशासक असताना राजकीय लुडबुड कशाला?

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांसाठी जनहिताचा कुठलाही निर्णय घेण्यास आमचा विरोध नाही. मात्र पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असताना राजकीय हस्तक्षेप आणि लुडबुड कशाला? मुंबईकरांचे निर्णय प्रशासक म्हणून घ्यावेत आणि मुंबईकरांना सेवा द्यावी. यामध्ये राजकीय लुडबुड कराल, तर खबरदार, असा इशारा भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी दिला. दरम्यान मुंबईकरांना चोवीस तास पाणी मिळावे, याला विरोध असण्याचे कारण नाही.


त्याबाबत पाठपुरावा आम्हीही करत आहोत. मात्र निवडणुका तोंडावर येताच आणि प्रशासकीय राजवट असताना सर्व मुंबईकरांना पाणी देणार, असा जो निर्णय घेण्यात आला तो राजकीय हितासाठी असून थेट मतदारांना भुलवणारा आहे. मग महापालिकेत प्रशासक असतानाही राजकीय लुडबुड कशाला? असा सवाल आशीष शेलार यांनी केला आहे.


मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांना पाणी द्यायला हवे याबाबत न्यायालयाने चर्चा केली होती, त्यामुळे आता सर्वांना पालकमंत्री पाणी देणार हा मुद्दा नवीन नाही. तसेच तो पूर्णही नाही. बरं सर्वांना देणार म्हणता, मग मुंबईतील कोळीवाडे, गावठाणांचा उल्लेख का करीत नाही. आमच्या या मूळ मुंबईकरांवर राग आहे का? बरं आता निवडणूका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचे पाणी कसं आठवलं? असा सवालही त्यांनी केला आहे.

Comments
Add Comment