
मुंबई : अभिनेत्री श्वेता केसवानी हिने एका मुलाखतीत बॉलीवूड आणि हिंदी टेलीव्हिजनशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले. तिने कास्टिंग काऊच विषयी देखील मोठे खुलासे केले आहेत.
मुलाखतीत कास्टिंग काऊचविषयी विचारलेल्या प्रश्नावर श्वेता केसवानी म्हणाली की, ''मी बॉलीवूडमध्ये काम नक्कीच केले आहे, पण कितीतरी सिनेमांवर मी पाणीदेखील सोडले आहे. कारण तिथे कास्टिंगसाठी गेले असताना मला सांगितले गेले की, तुम्हाला आऊटडोअर शूटच्या वेळेस एकटंच यायचे आहे आणि त्यावेळी मी आईला सोबत घेऊन प्रवास करायचे. त्यावेळी मी फक्त १८ वर्षांची होते. पण बऱ्याच सिनेमांच्या कास्टिंग दरम्यान सांगितले जायचे, कोणाला सोबत घेऊन येऊ शकत नाही, एकटीलाच आऊटडोअर शूटसाठी यायचे आहे''.
श्वेता केसवानी पुढे म्हणाली, ''कितीतरी वेळा सांगितले गेले की निर्मात्याशी जवळीक साधा. कधी सांगितले गेले की दिग्दर्शक जे बोलेल ते ऐकावेच लागेल आणि त्याच्यासोबत एकटीने वेगळा वेळ देखील घालवावा लागेल. जिथे एवढ्या अटी घातल्या जायच्या, असे अनेक सिनेमे मी मध्येच सोडून दिले आहेत. कारण मला माहित होते की हे 'कास्टिंग काऊच' आहे. मला इशाऱ्यांमध्ये हे सगळे करायला सूचित केले जायचे पण मी या सगळ्यासाठी तयार नव्हते. म्हणून मी सिनेमात काम करताना कमी दिसले कारण माझ्यासोबत कितीतरी सिनेमांच्या बाबतीत या गलिच्छ गोष्टी घडल्या आहेत. आणि मग मी सिनेमांच्या या घाणेरड्या गोष्टींना कंटाळून टी.व्ही. मालिकांमध्ये काम करणे सुरू केले. त्यावेळी टी.व्ही इंडस्ट्रीत खूप छान ट्रीटमेंट मिळाली''.
श्वेता पुढे म्हणाली, ''तसं देखील मला वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली जाते, जी तुमच्या मनाविरोधात असते तेव्हा तिथेच थांबलेलं बरं आणि अशा ठिकाणी काम न करण्याचा थेट निर्णय घेऊन टाका. मग असा प्रश्नच येणार नाही नं, की आधी सगळं मान्य करा आणि मग #Metoo चं रडणं गात बसा. असं तर तुम्ही म्हणू शकत नाही की तुमच्यासोबत चुकीचं घडत होतं आणि हे तुम्हाला माहीतच नव्हतं''.
टेलीव्हिजनमधील गटबाजीच्या प्रश्नावर श्वेता केसवानी म्हणाली, ''टेलीव्हिजनमध्ये गलिच्छपणा चालत नाही, पण गटबाजी नक्की आहे. जसं एकता कपूरचा ग्रुप. ज्यामध्ये फक्त तिच्या मर्जीतल्या कलाकारांना काम मिळते. पण मला याचा काहीच फरक पडत नाही. कारण मी कधीच एकता कपूरसोबत काम नाही केले. हॉलीवूडमध्ये संधी तुम्हाला फक्त तुमच्या गुणवत्तेवर आणि त्यानंतर ऑडिशन दिल्यावरच मिळते. मी आतापर्यंत हजारो ऑडिशन दिल्या आहेत, तेव्हा कुठे जाऊन मला कामं मिळण्यास सुरुवात झाली आणि अजूनही माझं स्ट्रगल संपलेलं नाही''.
'अभिमान', 'कहानी घर घर की' आणि 'देश में निकला होगा चाँद' अशा अनेक हिंदी टी.व्ही. मालिकांमधून प्रसिद्ध झालेली आणि घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता केसवानी सध्या हॉलीवूडच्या वाटेवर निघाली आहे. अभिनयात यश मिळतंय का यासाठी ती प्रयत्न ती करत आहे, असे तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे. श्वेता अमेरिकेचा प्रसिद्ध शो 'द ब्लॅकलिस्ट' मध्ये सुद्धा दिसली होती.