देवा पेरवी
पेण : शासनाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात गेली अनेक वर्षानंतर प्रथमच राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. पेण तालुक्यातील गागोदे बु येथे लाल मातीच्या भव्य मैदानावर सदर शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यस्तरीय बैलगाड्या शर्यती ग्रामस्थ मंडळ गागोदे बु यांच्यावतीने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून शेकडो बैलगाड्या संघ व हजारो शेतकरी सहभागी झाले होते. रुबाबदार बैल व देखण्या गाडीसह शेतकरी दाखल झाल्याने स्पर्धाला रंगत आली होती. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरीशेठ फडके, माजी आमदार धैर्यशील पाटील, सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षी स्पर्धा घेण्याचा मानस असल्याचे मंगेश दळवी यांनी बोलताना व्यक्त केला.
उद्घाटन प्रसंगी पंढरीशेठ फडके व धैर्यशील पाटील यांनी बोलताना सांगितले की, आजी-माजी आमदार, खासदार यांनी शर्यती सुरू करण्यासाठी निवेदन देत प्रयत्न केले होते. त्यांनी बैलगाड्या शर्यतीचे प्रश्न अधिवेशनात मांडले होते. या शर्यती तात्पुरत्या स्वरूपात सुरू केल्या आहेत. दुसरी केस कोर्टात चालू आहे. त्याचा निकाल जाहीर झाला की अजून घुमधडक्यात शर्यती सुरू केल्या जातील असेही त्यांनी सांगितले.