पालघर (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पालघर, शिक्षण विभाग प्राथमिक जि. प. पालघर व प्रथम संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ एप्रिल २०२२ रोजी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जि. प., न. प आणि म. न. पा. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील २ हजार १३० जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांचा समावेश असणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, नगरपालिकांच्या, महानगरपालिका शाळा व अंगणवाड्या बंद होत्या. २०२२-२३ सत्रात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना अभ्यासाची, शाळेची आवड निर्माण व्हावी व प्राथमिक कृती, कौशल्य पूर्ण व्हावे म्हणून शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांची शाळापूर्व तयारी व्हावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून राज्याचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुढील १२ आठवड्यांसाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे. यासाठी एस.सी.आर.टी पुणे व डायट पालघरच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मिळून ३०२ तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक व अंगणवाडी सेविका यांना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.
नंतर प्रत्येक केंद्रात प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व इयत्ता पहिलीला शिकवणारे शिक्षक यांचे सक्षमीकरण करण्यात आले. सकाळी ७.३० ते ८.३० प्रभात फेरी, ८.३० ते ९.०० मेळाव्याचे उद्घाटन, ९.०० ते १२.०० प्रत्यक्ष मेळावा यात नोंदणी, शारीरिक विकास क्षमता, बौद्धिक विकास क्षमता, सामाजिक आणि भावनात्मक विकास क्षमता, भाषा विकास क्षमता, गणनपूर्व तयारी क्षमता, मार्गदर्शन व प्रबोधन असे एकूण ७ स्टॉल्स असतील. या प्रत्येक स्टॉलवर जून २०२२मध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची माहिती देताना काही क्षमता तपासल्या जातील.
यामध्ये शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनात्मक विकास, तसेच भाषा विकास, गणनपूर्व आदी क्षमता तपासल्या जातील, असे या मेळाव्याचे स्वरूप आहे. यासाठी शाळांना शाळा पूर्वतयारी अभियान मेळाव्यात रिपोर्ट कार्ड (विकासपत्र), शाळेतील पहिले पाऊल पुस्तक, वर्कशिट कार्ड, आयडिया कार्ड, पालक समूह, आयोजकांसाठी सूचनापत्रक, पोस्ट कार्ड, प्रती शाळा, स्वयंसेवक प्रमाणपत्र, बॅनर शाळा असे साहित्य वाटप करण्यात आले आहे.
मेळावा पार पडल्यानंतर मातांचे गट तयार केले जाणार आहेत. या मातांना स्वयंसेवक मदत करणार आहेत. माजी विद्यार्थी, सुशिक्षित तरुण, सुशिक्षित पालक हे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. माता व स्वयंसेवक १२ आठवड्यांत बालकांची तयारी करून घेणार आहेत. यानंतर जून महिन्यात दुसरा व शेवटचा मेळावा असणार आहे. यात या १२ आठवड्यात बालकांची कितपत तयारी झाली हे तपासून पाहिले जाणार आहे. एकंदरच कोविड काळात पूर्व प्राथमिक वर्गाचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळापूर्व तयारी अभियान मेळावे उपयुक्त ठरणार आहेत.
या मेळाव्यात पालघरमधील – ४०८, डहाणू – ४५८, वसई – १९३, तलासरी – १५५, वाडा – २९६, विक्रमगड – २३५, जव्हार – २३१, तर मोखाडामधील १५४ शाळा सहभागी होणार आहेत. कोरोनाकाळात पूर्व प्राथमिक वर्गातील बालकांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने सुरू केलेला स्तुत्य असा उपक्रम आहे, असे प्रतिपादन सिध्दाराम सालीमठ (भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर यांनी केले आहे.
या मेळाव्यात माता, पालक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापक, दाखलपात्र विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे. यातून दाखलपात्र मुलांचा अपेक्षित विकास साधला जाईल, असे मत लता सानप, प्राचार्या डायट तथा शिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केले आहे. प्राथमिक मेळाव्यात पुस्तिका, वर्कशीट, आयडिया कार्डस् वितरित होतील. शिक्षकांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती तानाजी डावरे, बालशिक्षण विभागप्रमुख, डायट पालघर यांनी दिली आहे.