मुंबई (प्रतिनिधी) : आपण नक्कीच स्वत:ला सिद्ध करू, असे सांगताना उर्वरित स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी नक्की उंचावेल, असा विश्वास संघमालक नीता अंबानी यांनी व्यक्त केला आहे. सलग चार पराभवांनंतर त्यांनी एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ पोस्ट केला.
मला तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नक्कीच पुढच्या सामन्यापासून दमदार कामगिरी कराल, याची मला खात्री आहे. आता आपण जे झालं ते विसरून फक्त पुढे आणि गुणतालिकेत वर जाण्याची तयारी करू या. आपल्याला आपल्या स्वत:च्या कामगिरी विश्वास ठेवावा लागेल. आपण नक्कीच स्वत:ला सिद्ध करू, असे नीता अंबानी यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे.
आपण अशा विचित्र आणि कठीण प्रसंगांतून अनेक वेळा गेलो आहोत. अशा परिस्थितीवर मात करताना आपण विजेतेपदही मिळवलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, तुम्ही सर्वजण एकमेकांना सहकार्य करत राहाल. आपली लवकरच भेट होईल. तोपर्यंत माझा तुम्हा सर्वांना पूर्ण पाठिंबा आहे. कोणीही निराश होऊ नका. स्वत:वर विश्वास ठेवा आणि खेळत राहा, असे त्या म्हणाल्या.