Thursday, May 22, 2025

पालघर

बाजारकर वसुलीच्या ठेक्याने ग्रामपंचायतीचे नुकसान

बाजारकर वसुलीच्या ठेक्याने ग्रामपंचायतीचे नुकसान

माजी उपसरपंच राजेश करवीर यांचा आरोप


बोईसर (वार्ताहर) : जुलै २०२१मध्ये बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी देण्यात आलेला बाजारकर वसुलीचा ठेका बेकायदेशीर असल्याचे सांगत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ठेकेदारामार्फत बाजारकर वसुलीमध्ये होत असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर २०२१च्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून बाजारकर वसुली केली जात होती. दर महिन्याला तीन लाख रुपये बाजारकर गोळा केला जात असल्याचे माहिती अधिकारात उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे समोर आली आहे. २००२-२१ या आर्थिक वर्षात सुमारे ३६ लाख रुपयांचा बाजारकर गोळा झाला होता. पावती छपाई आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतन खर्च वजा केल्यास ग्रामपंचायतीच्या तिजोरीत वार्षिक ३२ लाख रुपयांचा बाजारकर ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा झाला होता.


परंतु मार्च २०२१-२२ आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीकडून बाजारकर वसुलीसाठी ठेकेदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेत लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती. लिलावाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवसांच्या कालावधीत दोन वर्षांचा बाजारकर वसुलीचा लिलाव प्रकाश संखे यांच्या मालकीच्या रोहन एंटरप्रायजेसला देण्यात आला आहे. पहिल्या वर्षासाठी २१ लाख रुपयांची बोली मान्य करण्यात आली, दुसऱ्या वर्षात दहा टक्के दरवाढ धरून २३ लाख रुपये रक्कम आकारण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळे ठेकेदाराला २ लाख ६५ हजारांची सूट देण्यात आल्याचे समोर आले आहे.


बाजारकर वसुलीचा ठेक्याच्या लिलावाची जाहीर सूचना प्रसिद्ध केल्यानंतर तीन दिवसांच्या कालावधीत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दरम्यान, बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा कार्यकाळ जुलै २०२१ मध्ये पूर्ण होणार असताना सरपंचांनी बेकायदेशीरपणे एप्रिल २०२२-२३ आर्थिक वर्षांची बाजारकर वसुलीची ठेका प्रक्रिया राबवल्याने सरपंचांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत ३६ लाख रुपये बाजारकर वसुली करण्यात आली होती; परंतु ग्रामविकास अधिकारी आणि माजी सरपंच यांनी संगनमताने बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून मर्जीतील ठेकेदाराला २१ लाख रुपयांच्या रकमेत ठेका देण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीचे दोन वर्षांत सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचे अर्थिक नुकसान झाल्याचा आरोप माजी उपसरपंच राजेश करवीर यांनी केला आहे. दरम्यान, संपूर्ण लिलाव प्रक्रियेची चौकशी करून कारवाईची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मासिक सभेत विषयावर चर्चा झाल्यानंतर बाजारकर वसुलीची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली आहे. लिलाव प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. लिलाव प्रक्रिया राबवल्यानंतर दीड-दीड वर्षांनी तीन दिवसांच्या मुदतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. बोईसर लगतच्या ग्रामपंचायतींनी दोन तसेच तीन वर्षांचे बाजारकर वसुलीचे लिलाव केले आहेत.- कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी, बोईसर ग्रामपंचायत


सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना बेकायदेशीर बाजारकर वसुली लिलाव प्रक्रिया राबवून ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान केले आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. - राजेश करवीर,माजी उपसरपंच,ग्रामपंचायत बोईसर

Comments
Add Comment