Friday, May 9, 2025

महामुंबई

दारूची दुकाने, बार यांना देवदेवतांची नावे देण्यास बंदी

दारूची दुकाने, बार यांना देवदेवतांची नावे देण्यास बंदी

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दारूची दुकाने, बार यांना देवता किंवा महापुरुषांचे नाव देण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक पंकज यादव यांनी २१ जानेवारी २०२० रोजी ठरावाची सूचना मांडत मुंबईतील दारूची दुकाने, बार यांना देवी-देवता, महापुरुषांची नावे ठेवण्यास बंदी घालावी अशी मागणी केली होती. अखेरीस राज्याच्या गृहविभागाने आदेश काढून बंदी घातली आहे.


मुंबईतील उपहारगृहे, मद्यालये, पब, डिस्को डान्स बार, मद्यालये, मद्यविक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या नावांमध्ये देवदेवतांच्या नावांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याचे दिसून येते. वास्तविक प्रत्येक धर्मात देवदेवता पूजनीय असतात आणि त्यांच्याप्रती प्रत्येक धर्मीयांमध्ये श्रद्धेची भावना असते. त्यामुळे मद्यालये इत्यादी आस्थापनांना देवदेवतांची नावे देण्यात येत असल्याने, विविध धर्मीयांच्या भावना दुखावतात. दुकाने व आस्थापन अधिनियमामध्ये दुकाने व विविध आस्थापने यांना महापुरुष किंवा गड किल्ल्यांची नावे न देण्याबाबत तरतूद आहे.


मात्र, देवदेवतांची नावे न देण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. सद्यस्थितीत, महानगरपालिकेला दुकाने/आस्थापन यांना नामफलकाच्या संदर्भातच कारवाई करण्याचे अधिकार आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महानगरपालिकेचे असे ठाम मत आहे की, उपाहारगृहे, मद्यालये, पब, डिस्को डान्स बार, मद्यालये, मद्य विक्री करणारी दुकाने अशा तत्सम आस्थापनांना देवदेवतांची नावे देण्यास प्रतिबंध करता येईल अशा रितीने दुकाने व आस्थापना अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Comments
Add Comment