मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेताना पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांवर परखड भूमिका मांडली. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे सरकारने मौलवींसोबत चर्चा करून हटवावे अन्यथा मशिदीसमोर भोंगे लावत हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी व्यासपीठावरून केवळ राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर तेथेही हनुमान चालीसा लावावी असं आवाहन केले होते. आता राज ठाकरेंच्या विधानाचं समर्थन करण्यासाठी अनेक हिंदू संघटना पाठिशी आल्या आहेत.
कर्नाटकात भाजपानेही मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. तर गोव्यात हिंदू जनजागृती समितीने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून गोव्यातील मशिदीवरील भोंगे हटवावे असं निवेदन दिले आहे. मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजाण दिली जाते त्यावरून गोव्यातही वाद सुरू झाला आहे. गोव्यातील हिंदुत्ववादी संघटना दक्षिण आणि उत्तर गोव्यातील मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. भाजपा सरकारने याबाबत प्रशासकीय आदेश लागू करावेत असं आवाहन केले आहे.