मुंबई : बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅब ट्रिटमेंट घेत असताना मध्यमगती गोलंदाज दीपक चहरच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचे आयपीएलमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता मावळली आहे. दुखापत किती गंभीर स्वरूपाची आहे, याबाबत चेन्नई सुपर किंग्जला बीसीसीआयकडून अद्याप औपचारिक अहवाल मिळालेला नाही.
दीपक चहर गेल्या महिन्याभरापासून एनसीएमध्ये उपचार घेत आहे. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या टी-ट्वेन्टी मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. एनसीए फिजिओच्या प्राथमिक अंदाजानुसार, दीपक चहर आयपीएलमधील पहिल्या टप्प्याला मुकेल, असे बोललं जात होते. तो तंदुरूस्त झाल्यास एप्रिलच्या उत्तरार्धात पुनरागमनासाठी चेन्नईचा संघ आशावादी होता. पण आता नव्याने झालेल्या दुखापतीमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यापासून चेन्नईच्या अडचणी काही केल्या संपतच नाहीत. माजी विजेता चेन्नईने पहिले चारही सामने गमावले. दीपक चहरशिवाय संघाच्या वेगवान गोलंदाजीत अपेक्षित प्रभाव दिसत नाही.