Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रसप्तश्रुंगी गडावर निघालेल्या भाविकांवर दगडफेड

सप्तश्रुंगी गडावर निघालेल्या भाविकांवर दगडफेड

गुन्हे शाखेचे पथक सक्रीय; हल्लेखोरांचा शोध सुरू

मालेगाव (प्रतिनिधी): चैत्रोत्सवासाठी सप्तश्रुंगी गडावर निघालेल्या भाविकांच्या जत्थ्यावर दगडफेक झाल्याची घटना मालेगाव हद्दीत घडली आहे. शिरपूर येथे झालेल्या या दगडफेकीमध्ये एक भाविक जखमी झाला असून अचानक झालेल्या दगडफेकीमुळे खळबळ माजली आहे. भेदरलेल्या भाविकांनी नंतर छावणी पोलिस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितल्यावर त्याबाबतची नोंद घेण्यात आली.

दरवर्षी चैत्रोत्सवासाठी खान्देशातून मोठ्या संख्येने भाविक पायी वणी गडावर जात असतात. काही जत्थे आपल्यासोबत डीजे, बेन्जो आदी साऊंड सिस्टमवर भक्तीगीतांचे संगीत लावून गडावर येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे चैत्रोत्सव साजरा होऊ शकला नव्हता. यावेळी कोरोना निर्बंध उठविण्यात आल्याने परंपरेनुसार भाविक गडावर जात आहेत.

त्याप्रमाणे शिरपूर येथील एक गट मंगळवारी सकाळी मालेगाव हद्दीतून जात असताना फारान हॉस्पिटलजवळ त्यांना अडविण्यात आले. अजान चालू असल्याने डीजे बंद करण्याची सूचना झाली. त्याप्रमाणे त्यांनी शांतता बाळगली. या दरम्यान, काही टारगटांनी एकाचा मोबाईल हिसकावला. तर काही वेळाने दगडफेक झाली. त्यात एक युवक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बिथरलेल्या भाविकांनी मोसम पूल गाठत जवळील छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. यादरम्यान, कृषिमंत्री दादा भुसे यांनी देखील छावणी पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती घेतली. तेव्हा पोलिस ठाण्यासमोर अनेक कार्यकर्त्यांनी ठिय्या देत कारवाईची मागणी केली.

भाजपचे नगरसेवक मदन गायकवाड यांनीदेखील पोलिसांकडे भविष्यात भाविकांना काही अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी केली. कृषीमंत्री भाविकांना सामोरे गेले व पोलिस याप्रकरणी योग्य ती कारवाई करतील, याची शाश्वती दिली. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रीय करण्यात आले असून, ते हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -