Tuesday, July 9, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखशाहबाज शरीफ यांच्यापुढील आव्हाने

शाहबाज शरीफ यांच्यापुढील आव्हाने

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड झाली. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू व पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्याकडे आता देशाची सूत्रे आली आहेत. इम्रान खान यांना अविश्वासदर्शक ठरावाद्वारे, संसदीय मार्गाने सत्तेवरून खाली खेचण्यात यश आल्याने पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीने राजीनामा देणारे इम्रान खान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. हा सत्ताबदल इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी नेत्यांना पचविणे तेवढे सोपे नाही. त्यातून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे लोक रस्त्यावर आमने-सामने येऊ शकतात, अशी पाकिस्तानात स्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाहोर, कराची, मुलतान आणि फैसलाबाद या शहरांमध्ये जोरदार निदर्शने सुरू केली. त्यातून इम्रान खान यांचा ‘नया पाकिस्तान’ आणि शाहबाज शरीफ यांचा ‘पुराना पाकिस्तान’ असा घनघोर संघर्ष पाहायला मिळू शकतो.

इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था कोलमडली, असा आरोप शरीफ यांनी केला आहे. त्यांनी पाकिस्तानी समाजात जहर पसरविले आहे, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी बराच काळ लागेल, असे शरीफ यांना वाटते. तर शरीफ यांच्या भ्रष्ट सरकारविरोधात निदर्शनांचे आयोजन करून पाकिस्तानच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला असल्याचा नारा इम्रान खानच्या पक्षाने दिला. सत्तेवर येण्यापूर्वी इम्रान खान यांनी ‘नया पाकिस्तान’ची घोषणा केली होती, तर शाहबाज शरीफ आणि त्यांचे सहकारी ‘पुराना पाकिस्तान’ परतल्याचे दावे करीत आहेत. त्यामुळे नया व पुराना पाकिस्तानमध्ये आता जबर संघर्ष पेटणार असे दिसते. सत्तेवर येत असतानाच, नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपण काश्मीरचा प्रश्न सोडून देणार नाही, अशी ग्वाही पाकिस्तानच्या जनतेला दिली आहे. मात्र शरीफ घराण्याकडे पंतप्रधानपद आल्यानंतर भारताबरोबरील संबंध प्रस्थापित केले जातील, अशी टीका इम्रान खान यांचे समर्थक आता करू लागले आहेत. भारताबरोबरील मैत्रीसाठी तसेच व्यापारासाठी काश्मीरचा मुद्दा सोडून दिला जाईल, असे आरोपही तेथील कट्टरपंथीय विश्लेषक करत आहेत. या दबावाखाली आलेल्या शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबाबत खुलासा केला असावा.

ब्रिटन व ऑस्ट्रेलियात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानींनी इम्रान खान यांच्या गच्छंतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या लंडनमधील निवासस्थानाजवळ निदर्शने केली. ‘नो इम्रान खान, नो रेमिटन्स’ अर्थात इम्रान खान नसतील, तर आम्ही पाकिस्तानात पैसे धाडणार नाही, असा इशारा अनिवासी पाकिस्तानी देत आहेत. त्यामुळे शरीफ यांना अनिवासी पाकिस्तानी जनतेची समजूत काढण्याचे काम करावे लागणार आहे. इम्रान खान २०१८ मध्ये कोट्यवधी नोकऱ्या, भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि जीवनाश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आले होते. तसे काहीही झाले नाही. देशावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या सर्व आघाड्यांवर इम्रान खानच्या नेतृत्वाखाली सरकारला अपयश आल्याने लष्करी आस्थापनांमध्ये असंतोषाची पहिली बीजे पेरली गेली होती. इम्रान खान यांच्या कट्टर भारतविरोधी भूमिकेमुळे भारताचे पाकिस्तानबरोबरील संबंध विकोपाला गेले होते. पण आता नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांचे राजनैतिक संबंध नव्याने प्रस्थापित होतील, असा दावा केला जातो. भारताबरोबरील संबंध सुधारण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केलेले प्रयत्न, हे त्यांच्या गच्छंतीचे प्रमुख कारण मानले जाते. मात्र यावेळची स्थिती थोडी वेगळी आहे. पाकिस्तानात भयंकर आर्थिक, राजकीय संकटात असल्याने पाकिस्तानच्या लष्करालाच आता भारताबरोबर सहकार्य हवे आहे. या लष्करातील कट्टरवादी गट याला विरोध करीत असला तरी जनरल बाजवा यांना भारताबरोबर सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे नजीकच्या काळात राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यास शाहबाज शरीफ व त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांमुळे भारत व पाकिस्तानच्या संबंधांमध्ये काही अंशी सुधारणा होऊ शकते. मात्र पाकिस्तानातील कट्टरपंथीय याविरोधात नेहमीप्रमाणे

जहाल भूमिका घेण्याची दाट शक्यता आहे. त्यात पंतप्रधान शरीफ यांनाही पुढील लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचा मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यातील संघर्ष या मुद्द्यावरून चव्हाट्यावर आला होता. इम्रान खान यांनी आयएसआयचे माजी प्रमुख फैज हमीद यांना मोठ्या पदावर आणायचे होते. त्याला जनरल बाजवा यांनी विरोध केला होता. त्यामुळे बाजवा यांच्या निवृत्तीनंतर लष्करातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना शाहबाज शरीफ यांना अत्यंत सावधगिरीने मार्ग काढावा लागणार आहे.
इम्रान खान यांच्या नया पाकिस्तानच्या घोषणेमुळे झालेली वाताहत लक्षात घेता, जनता आता ‘पुराना पाकिस्तान’मध्ये स्वागत करत असल्याचा टोला पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख नेते बिलावल भुत्तो यांनी लगावला आहे. आमचे सरकार कुणावरही सुडाने कारवाई करणार नाहीत, पण कायदा आणि न्याय आपले काम करील, अशी माहिती पंतप्रधान शरीफ यांनी दिली आहे; परंतु पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास पाहता सूडबुद्धीने कारवाई होईल या भीतीने नवाझ शरीफ यांच्यासह मुर्शरफ यांनाही सत्तेवरून पायउतार झाल्यावर देश सोडावा लागला होता. आता इम्रान खान हे पाकिस्तानात राहून संघर्ष करणार की, देश सोडणार हे येणारा काळ ठरवेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -