Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेसीजीएसटीने जिंकली डीएससीए स्पोर्ट्स शील्ड स्पर्धा

सीजीएसटीने जिंकली डीएससीए स्पोर्ट्स शील्ड स्पर्धा

करण, सागर विजयाचे शिल्पकार

ठाणे (प्रतिनिधी) : सीजीएसटी संघाने स्पीड स्पोर्ट्सचा १२२ धावांनी दणदणीत पराभव करत कोरोना महामारीमुळे दोन वर्षे लांबलेल्या डीएससीए स्पोर्ट्स शील्ड मर्यादित षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अर्धशतक झळकवणारा करण वसोडिआ आणि चार विकेट मिळवणारा सागर मिश्रा सीजीएसटी संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

प्रथम फलंदाजी करताना करण वसोडीआने ६९ धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. सीजीएसटी संघाने ४० षटकांत ८ बाद २२६ धावा रचल्या. लक्ष्यने २७ आणि अमित दाहियाने २२ धावा केल्या. मन कोळीने सीजीएसटी संघाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवताना ४२ धावांत ३ विकेट्स मिळवल्या, तर लखन जाधवने दोन फलंदाज बाद केले. विजयाच्या लक्ष्य साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्पीड स्पोर्ट्स डाव सागर मिश्राने आपल्या अचूक गोलंदाजीने २५व्या षटकात १०४ धावांवर गुंडाळला.

सागरने ७ षटकात एका निर्धाव षटकासह ३६ धावांत चार फलंदाज बाद केले, तर यश चौहान आणि राहुल पहाडियाने प्रत्येकी दोन, तेजस सॅलियनने एक विकेट मिळवली. पराभूत संघातील वेदांत वाडकरने २२, स्वप्नील रामदासने १४ आणि साई गायकवाडने १६ धावा केल्या.

अंतिम लढतीत चार विकेट्स मिळवणाऱ्या सीजीएसटी संघाच्या सागर मिश्राला स्पर्धेतील, सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पीड संघातील आदित्य गंगारे स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ठरला. ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित स्पर्धेचा अंतिम सामना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खेळवण्यात आला नव्हता.

संक्षिप्त धावफलक

सीजीएसटी संघ :

४० षटकात ८ बाद २२६ (करण वसोडिआ ६९, लक्ष्य २७, अमित दाहिया २२, मन कोळी ७-०-४२-३, लखन जाधव ७-०-४२-२)

विजयी विरुद्ध स्पीड स्पोर्ट्स क्लब :

२५ षटकात सर्वबाद १०४ (स्वप्निल रामदास १४, वेदांत वाडकर २२, साई गायकवाड १६, सागर मिश्रा ७-१-३६-४, यश चौहान ७-०-१३-२, राहुल पहाडिया ५-१-१६-२, तेजस सॅलियन ३-०-१८-१)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -