मुंबई : ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे भाजपा नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी तपास करून दोन दिवसात अहवाल द्यावा, असा आदेश राज्य महिला आयोगाने दिला आहे.
या महिलेने यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आयोगाकडे तक्रार केली होती. तिने पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने या महिलेने आयोगाकडे तक्रार केली आहे. या संबंधातून आपल्याला पंधरा वर्षाचा मुलगाही असल्याचा दावा या महिलेने केला आहे.
१९९३ पासून नाईक आपले लैंगिक शोषण करत आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष देऊन तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आपले लैंगिक शोषण केले. नाईक यांच्या धमक्यांमुळे आपल्याला त्यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रहावे लागत आहे. आपल्याला वैवाहिक अधिकार मिळावेत तसेच या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मिळावा यासाठी या महिलेने नाईक यांच्याकडे सतत तगादा लावला होता. मात्र त्यावर गणेश नाईक यांनी या महिलेला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तर गणेश नाईक यांचा मुलगा संदीप हादेखील या महिलेला गणेश नाईक यांच्याशी असलेले संबंध सोडून इतरत्र निघून जावे यासाठी या महिलेला व तिच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता, असा या महिलेचा आरोप आहे.
या महिलेने पोलिसांना लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही, तसेच या महिलेला व तिच्या मुलाला सुरक्षाही पुरवली नाही. त्यामुळे नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा व आपल्याला पोलिस संरक्षण द्यावे अशी तक्रार या महिलेने राज्य महिला आयोगाकडील अर्जात केली होती. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६, ४२०, ५०४, व ५०६ नुसार गुन्हा नोंदवावा, अशी तिची मागणी आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. अध्यक्षांच्या सूचनेनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देशही महिला आयोगाने दिले आहेत.