मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि आंदोलकांना भडकावण्याच्या आरोपाखाली अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेकजण सदावर्तेंच्या अटकेनंतर रुजू झाले आहेत. मात्र, अटकेचा आणि कामावर रुजू होण्याचा संबंध नसल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. कर्मचारी पुन्हा कामावर रूजू होत असल्याने राज्यातील एसटी पुन्हा पूर्ण क्षमेतेने धावण्याची शक्यता वाढली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची बाजू हायकोर्टात मांडणारे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि काही आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा कामावर परतण्याचा ओघ वाढला असल्याचे दिसून येते. कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या ११ एप्रिलपर्यंत ४४ हजार ४३५ वर पोहचली आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे लांबली असल्याचे म्हटले जात आहे. बुधवार, गुरुवारपर्यंत कामावर परतणाऱ्यांची संख्या 50 हजार होण्याचा अंदाज आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी मागील पाच महिन्यांपासून संप पुकारला आहे. एसटीमध्ये सध्या २९,३०३ चालक आणि १४,६७० वाहक आहेत. त्यातील अनेकजण पुन्हा कामावर रुजू होत आहेत. त्यातील अनेकांची नियुक्ती वैद्यकीय कारणांनी लांबली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हे कर्मचारी कामावर रुजू होणार आहे. हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देशही राज्य सरकार, एसटी महामंडळाला देण्यात आले होते.
सदावर्तेंना स्वखुशीने पैसे दिल्याचे कर्मचाऱ्यांकडून घोषणापत्र
एसटी कामगारांसाठी न्यायालयीन लढा देत त्यांचा नेतृत्व करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आम्ही स्वखुशीने प्रत्येकी तीनशे रुपये दिले होते, अशा आशयाचं एक घोषणा पत्र सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फिरत आहे. न्यायाधीशांना उद्देशून हे घोषणा पत्र असून त्याची प्रतिलिपि पोलीस अधिकाऱ्यांना आहे. हे घोषणापत्र कोणी तयार केले याबद्दल त्यात कुठलाही उल्लेख नसला तरी सदावर्ते यांना स्वखुषीने तीनशे रुपये दिल्याची घोषणा करणाऱ्या कामगाराची स्वाक्षरी त्यामध्ये असावी अशा पद्धतीने हे घोषणापत्र तयार करण्यात आले आहे.
‘सिल्वर ओक’ वरील आक्रमक आंदोलन प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या सदावर्ते यांना न्यायालयीन लढाईत त्यांनी एसटी कामगारांकडून दबावाने, बळजबरीने पैसे गोळा केलेले नाही हे सिद्ध करण्यासाठीच हे घोषणापत्र तयार करण्यात आले असावे अशी चर्चा आहे.