Tuesday, May 20, 2025

ताज्या घडामोडीरायगड

मुरूड तालुक्यात समुद्र किनारी तेलतंवग

मुरूड तालुक्यात समुद्र किनारी तेलतंवग

मुरूड (वार्ताहर) : मुरुड तालुक्यातील समुद्र किनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तेल वाहून आले असून किनारा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाला आहे. स्थानिक रहिवासी व येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. या तवंगामुळे समुद्र किनारी सापडणारे लहानमोठे समुद्री जीव धोक्यात आले आहेत. समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्यांनाही या तेलतवंगामुळे मोठा फटका बसत आहे.


मुरूड शहरासह तालुक्यातील आगरदांडा, एकदरा, नांदगाव, दांडे, काशीद, बार्शीत, बोर्ली, कोर्लई समुद्र किनारी तेलवंग आढळून आले आहे. तेल येण्याचे प्रमाण दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम आहे. खोल समुद्रातून वाहून आलेले तेल वाळूत मिसळल्यामुळे त्याचे गोळे तयार झाले आहेत. ते किनाऱ्यावर पसरल्याने संपूर्ण समुद्रकिनारा प्रदूषित झाला आहे.


समुद्रात तेल आल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. समुद्रकिनाऱ्यावर तेलतवंग असल्यामुळे पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी उतरत नाही. याचा आर्थिक फटका समुद्रकिनारी घोडा गाडी, बग्गी चालक, घोडेस्वार यांना सहन करावा लागत आहे.


स्थानिक मच्छीमारांनाही याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. कारण खोल समुद्रात मासे मिळत नसल्याने किनाऱ्यावर मासेमारी करून आपली उपजीविका करावी लागते. आता एक आठवडाभर तेल तवंग आल्याने किनारी मिळणारे मासे मिळत नसल्याने मच्छीमारांनाही त्रास सहन करावा लागत आहे.


समुद्रकिनारी येणाऱ्या तेलाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी मच्छीमारांनी शासनाकडे केली आहे. मुंबईतील खोल समुद्रात तेल कंपन्यांच्या तेल विहिरी आहेत. तेथून गळती झाल्यास असे तेलाचे तवंग समुद्रकिनारी येत असतात. तेल कंपन्यांकडून मच्छीमारांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मुरुड समुद्रकिनारी डांबर सदृश्य चिकट आणि जाडसर तेल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली आहे.


खोल समुद्रातील मासेमारी सध्या बंद असली तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समुद्र किनारी जाळी टाकून (पेऱ्याने) मासेमारी केली जाते. तथापि, वाहून आलेल्या खराब तेलामुळे समुद्रातील पाणी दूषित होते आणि मासे दूर खोल समुद्रात जातात. परिणामी किनाऱ्यावरील मासेमारीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.


पर्यटकांचे दुरून डोंगर साजरे


समुद्रकिनारी आलेले तेल हे खूप अडचणीचे ठरत आहे. स्थानिक मच्छीमारांसोबत याचा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटक समुद्रात जाण्यास उत्सुक नाहीत. दुरून डोंगर साजरे याप्रमाणे ते लांबूनच समुद्र किनारा पाहाताना दिसत आहेत.

Comments
Add Comment