
नवी दिल्ली (हिं.स) : १८५७ ते ९१४७ या ९० वर्षांच्या काळात ज्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी लढा दिला त्यांचा त्याग आणि खंबीरपणा याविषयी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या नव्या पिढीला माहिती द्यायला हवी, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. शाह यांच्या हस्ते “अमृत समागम” या देशभरातील पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या परिषदेचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घटना आणि शूर वीरांची चरित्रे तरुणांसमोर जिवंतपणे उभी करायला हवी. तेव्हाच हे तरुण स्वतःला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून घेऊ शकतील आणि म्हणूनच या नव्या पिढीच्या मनांमध्ये राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेची बीजे रुजवून एक अशी नवी पिढी निर्माण करायची आहे जी संपूर्ण जीवनभर या प्रेरणेतून देशासाठी कार्य करणे सुरु ठेवेल. १२ मार्च २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी गांधी आश्रम येथून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सोहोळ्याची सुरुवात केली होती, त्यानंतर देशात या संदर्भात २५ हजारहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात कोविड-१९ आजाराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे कठीण परिस्थिती उद्भवली आणि त्यामुळे अनेक कार्यक्रम मिश्र पद्धतीने आयोजित करावे लागले. त्याचा परिणाम म्हणून या कार्यक्रमांमध्ये म्हणावा तसा लोकसहभाग मिळवता आला नाही. पण आता आपला देश कोविड-19 च्या विळख्यातून बाहेर पडत आहे. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उरलेला काळ आपण मोठ्या लोकसहभागाने साजरा केला पाहिजे असे ते म्हणाले.
देशातील प्रत्येक गाव, तहसील, जिल्हा, आणि हरेक राज्य स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव सोहोळ्यात कशा प्रकारे सहभागी होईल आणि त्यासाठी कार्यक्रम निर्मिती करून ते यशस्वी कसे करता येतील हे आपल्याला या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये निश्चित करायचे आहे असे केंद्रीय सहकार मंत्री शाह यांनी सांगितले.