नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात सातत्याने वन्य प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना वरचेवर घडत आहेत. सिन्नर येथे मंगळवारी पहाटे लांडग्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एक वृद्धा जखमी झाली आहे. तर रात्रीच्या वेळेस नाशिक – नगर सीमेवरही लांडग्याने केलेल्या हल्ल्यामध्ये किमान पंधरा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. वन्यभागांतील पाणवठे सुकल्यामुळे आता वन्यप्राणी नागरी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळेवाडी या भागामध्ये आज पहाटे चारच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यामध्ये श्रीमती विठाबाई अर्जुन नरोडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर दुसरा हल्ला आज सोमवारी संध्याकाळी उशिरा नाशिक नगर सीमावर्ती भागामध्ये घडला असून नागरी वस्तीमध्ये एका लांडग्याने हल्ला करून सुमारे १५ जणांना जखमी केले आहे.
या हल्ल्यामध्ये अलका चांगदेव मस्के, ताराबाई काशिनाथ थोरात, विमलबाई विष्णुपंत दुबे, वेणूबाई माधव थोरात या चौघीजणी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर या लांडग्याने पुढे कोळगाव माळ परिसरात पिंकोडे वस्तीवरील असलेल्या महिलांवरही हल्ला केला. त्यात सविता अनिल बेंडकुळे आणि गुलाम भाई शेख हे जखमी झाले. तर शिंदेवाडी येथे याच लांडग्याने केलेल्या हल्ल्यात वाळीबा हंडोरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
त्यामुळे प्राण्यांचे नागरी वस्तीत घुसून हल्ले करण्याच्या घटनांत वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.