Monday, January 20, 2025
Homeक्रीडाचेन्नईला विजयी सूर गवसणार ?

चेन्नईला विजयी सूर गवसणार ?

आज बंगळूरुशी गाठ

नवी मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या हंगामातील पहिले चारही सामने गमावलेल्या गतविजेत्या चेन्नईसमोर पराभवाची कोंडी फोडण्याचे मोठे आव्हान आहे. मंगळवारी चेन्नईची बंगळूरुशी गाठ आहे. गतविजेत्या चेन्नईला यंदाच्या हंगामात नेतृत्वाची केलेली खांदेपालट भोवल्याचे दिसते. महेंद्रसिंह धोनीने चेन्नईच्या नेतृत्वपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर आली.

पण नव्या कर्णधाराला पहिल्या विजयाचा शोध अजूनही कायम आहे. कोलकाताविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापासून सुरू झालेली पराभवाची मालिका अद्यापपर्यंत रोखण्यात चेन्नईला अपयश आले आहे. कोलकाता, लखनऊ, पंजाब आणि हैदराबाद अशा चारही सामन्यांत चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. कधी फलंदाजांचे अपयश, तर कधी २१० धावा करूनही गोलंदाजांनी केलेली निराशा अशा चक्रव्यूहात चेन्नईचा संघ अडकला आहे. संघातील समतोल ढासळला असल्याने पराभव त्यांची पाठ सोडत नाहीय. फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांना ती कमतरता भरून काढता येत नाहीय. तर कधी गोलंदाज अपयशी ठरले, तर फलंदाजही निराशा करत आहेत.

त्यामुळे तारांकीत खेळाडू असले तरी त्यांना मोक्याच्या क्षणी येत असलेले अपयश संघाची दुखरी नस ठरत आहे. रॉबिन उथप्पा, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, शिवम दुबे, अंबाती रायडू या फलंदाजांनी धावा केल्या आहेत पण त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. ऋतूराज गायकवाड यंदा आतापर्यंत प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही. दुसरीकडे ब्रावो, जडेजा, मोईन अली, जॉर्डन, मुकेश चौधरी, महेश थिकशन या गोलंदाजांना सांघिक कामगिरी करता आलेली नाही.

दुसरीकडे, बंगळूरुने ४ पैकी ३ सामन्यांमध्ये विजयी पताका उंचावला आहे. सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. चेन्नईला नेतृत्वबदल भोवला असला तरी बंगळूरुला मात्र नेतृत्वबदल फळला असल्याचे दिसते. नवा कर्णधार फाफ डु प्लेसीस नेतृत्वासह फलंदाजीतही दमदार कामगिरी करत आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर मोकळेपणाने फलंदाजी करताना दिसत आहे. बंगळूरुने सलामीच्या सामन्यात २०५ धावा करूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यातून धडा घेत संघाने नंतरचे तिन्ही सामने जिंकले. फाफ डु प्लेसीस, विराट कोहली, दिनेश कार्तिक, शहबाज अहमद, अनूज रावत यांच्या फलंदाजीतून धावा येत आहेत, तर बंगळूरुचे गोलंदाजही प्रभावी कामगिरी करत आहेत.

वेळ रात्री ७.३० वाजता

ठिकाण डी. वाय. पाटील स्टेडियम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -