पालघर (प्रतिनिधी) : कामण बापाणे रस्त्याच्या जागेत पुन्हा उभी राहिलेली अधिकृत बांधकामे लवकरच तोडून टाकू, तसेच वनखात्याची परवानगीही लवकरच मिळवू. २०२२-२२ ची राज्य दरसूची लागू करण्यात आली असून त्यानुसार प्रस्तावास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेऊन रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या कामास सुरुवात करू, असे लेखी पत्र वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नीलम निजाई प्र. सहाय्यक आयुक्त प्रभाग ‘जी’ वालीव, यांनी कामण बापाणे रस्ता संघर्ष समितीचे अध्यक्ष केदारनाथ म्हात्रे यांना दिले.
कामण बापाणे रस्ता संघर्ष समितीने कामण बापाणे रस्ता लवकरात लवकर तयार करण्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलनाद्वारे ज्या मागण्या पुढे केल्या होत्या, त्या महापालिकेने तत्त्वतः मान्य केल्या. त्यामुळे उद्या कामण भिवंडी रोडवर कामण विठ्ठल मंदिरासमोर आयोजित करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे कामण बापाणे रस्ता संघर्ष समितीने जाहीर केले आहे.
कामण बापाणे रस्त्याचे गेल्या ३० वर्षांपासून रखडलेले काम आता तरी महापालिकेने जलदगतीने सुरू करावे म्हणून कामण बापाणे रस्ता संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन जनजागृती केली होती. कामण पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, सामाजिक संस्थांनी व महिला मंडळानी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शविला होता. न भुतो न भविष्यती अशा प्रकारच्या तबेले हटाव आंदोलनाच्या वेळीच्या आंदोलनाच्या इतिहासाची पुनरावृत्ती कामण-भिवंडी रोडवर कामण येथे होणार होती. दरम्यान, आंदोलनाच्या अगोदरच महापालिकेने रस्त्यांसंबंधीच्या मागण्या मान्य केल्यामुळे कामण परिसरांतील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
तर पुन्हा आंदोलन
दरम्यान, सदर रस्तेप्रकरणी महापालिकेने आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरात लवकर कार्यवाही सुरू केली नाही तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा केदारनाथ म्हात्रे यांनी दिला.