Wednesday, March 26, 2025
Homeमहत्वाची बातमीपन्नास लाखाच्या घड्याळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले - आशिष शेलार

पन्नास लाखाच्या घड्याळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले – आशिष शेलार

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड ते दहिसर दरम्यानच्या नाल्यांची पाहणी आज भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. तेव्हा नाल्यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला असून ही काय नवीन शेती तर केली जात नाही ना? असा सवाल करीत हे कधी साफ होणार? याबाबत चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही दौरे करायला लागताच पन्नास लाखाच्या घड्याळात ज्यांचे टायमिंग चुकले ते आता जागे झाले, अशी टीका ही आशिष शेलार यांनी केली.

सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजपाने नालेसफाईचा पाहणी दौरा आयोजित केला असून मालाड, गोरेगाव, बोरिवली, दहिसर या भागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. डहाणुकर वाडीतील नाला असो वा पोयसर नदी यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला असून अद्याप अनेक ठिकाणी कामाला सुरूवात झालेली नाही. तर काही नाल्यामध्ये आता एक एक जेसीपी, पोकलेन मशिन उतरवून काम करण्यात येते आहे. त्यामुळे कामांची गती वाढवणे आवश्यक असून या वेगाने गेल्यास कधी कामे पुर्ण होणार ? असा सवाल भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा, यांच्यासह स्थानिक नगरसेवक, भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते.

दरम्यान, याबाबबत बोलताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, कामांना अद्याप कुठेही वेग आलेला नाही. कामांना गती देण्याची गरज आहे. मुळातच कामांना मंजूरी देण्यास विलंब झाला. भाजपाने रेटा वाढविला त्यानंतर प्रशासन जागे झाले. आम्ही नाल्यावर भेटी देऊ लागताच प्रशासन आणि कंत्राटदारांची पळापळ सुरू झाली आहे. पण ज्यांची ही जबाबदारी होती ते कारभारी मुदत संपली असं सांगून फरार झाले होते. भाजपाने दौरे सुरू करताच पालकमंत्र्यांनी आता दौरा करण्याचे जाहीर केल्याचे वाचनात आले. ज्यांचे पन्नास लाखांच्या घड्याळात टायमिंग चुकले होते त्यांना भाजपामुळे जाग आली आहे. मुंबईकरांची आता आठवण झाली अशी टीका आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.

यांना रेल्वे उड्डाण पुलावर बोलण्याचा अधिकार आहे का?

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी लोअर परेल येथील उड्डाणपुलाला होत असलेल्या विलंबा बाबत रेल्वेवर टीका केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, हा रेल्वे उड्डाणपुल लवकर व्हावा ही आमचीही मागणी आहे. पण आज जे अचानक जागे झाले त्यांना उड्डाण पुलाबाबत बोलण्याचा अधिकार आहे का? ज्यावेळी प्रभादेवी आणि परेल येथील पादचारी पुल कोसळला, मुंबईकंराचे मृत्यू झाले त्यावेळी आम्ही केंद्र सरकारला विनंती करुन निकड लक्षात आणून देत सैन्य दलाला मुंबईत पाठविण्याची विनंती केली. सैन्य दल आले त्यांनी विक्रमी वेळेत पादचारी पुल पुर्ण केले. पण जेव्हा मुंबईकरांसाठी सैन्य दल रेल्वे पटरीवर उतवरले गेले तेव्हा, आज जे बोलत आहेत त्यांचा पक्ष त्यावर त्यावेळी टीका करीत होता. त्यामुळे आज तुम्ही बोलण्याचा नैतिक अधिकार गामवून बसला आहात, अशी खरमरीत टीका आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -