
मुंबई (प्रतिनिधी) : भारूलता पटेल कांबळे या महिलेने सोलो ड्रायव्हिंग करीत अर्थात एकटीने गाडी चालवत आतापर्यंत सात विक्रम केले असून यंदा आणखी एक नावीन्यपूर्ण विक्रम करण्याचा निर्णय तिने घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा आगळा-वेगळा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या दोन शाळकरी मुलांसह भारतभ्रमण करणार असल्याची घोषणा तिने सुरत येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केली. या प्रवासादरम्यान ती ६५ हजार किलोमीटर अंतर पार करणार आहे. गुजरातमधील दांडी येथे महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला होता याची जाणीव ठेवून येत्या जून महिन्यापासून ती तेथूनच प्रवासाला सुरुवात करणार आहे. हा प्रवास पाच महिन्यांचा असेल. भारूलता हिने आतापर्यंत केलेल्या प्रवासादरम्यान प्रत्येक वेळी सामाजिक कार्याचा संदेश सर्व दूर पसरवले आहेत. यावेळी प्रत्येक राज्यातील स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या स्वातंत्र्यवीरांना आपल्या मुलांसह ती अभिवादन करणार आहे.
भारतभ्रमण करताना येत्या स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्ट रोजी सियाचीन येथे पाकव्याप्त काश्मीर आणि चीनव्याप्त भारत यांच्या दोन सीमारेषांमध्ये आई आणि प्रीयम व आरूष ही दोन मुले आपला प्रिय तिरंगा फडकवणार आहेत. यापूर्वी भारूलताने एकटीने गाडी चालवीत युरोप आणि आशिया खंडाचा ३२ देशातून ३५ हजार किलोमीटर प्रवास केला त्यावेळी बेटी बचाव, बेटी पढाव या घोषवाक्याचे पोस्टर गाडीवर लावले होते. दुसऱ्यांदा स्वत: ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली असल्याने कॅन्सर जागृतीचे फलक गाडीवर लावले. या तिघांच्या टीमने १४ देशातून १० हजार किलोमीटर अंतर पार करून आर्क्टिक सर्कल गाठले आणि प्रचंड थंडीत उत्तर ध्रुवावर झेंडावंदन केले. हा विश्वातील तमाम महिलांसाठी अभिमानाचा विषय आहे. आता भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे. भारूलता आपल्या कुटुंबासह लंडनहून भारतात परतली आहे. सध्या वास्तव्य सुरत येथे आहे.
भारूलताने सोलो ड्राईव्हिंग, ही मोहीम यशस्वी केली असून त्याद्वारे देशापुढील ज्वलंत प्रश्न मांडण्यात आले आहेत तसेच जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे, अशी माहिती तिने दिली. भारूलता पटेल-कांबळे यांची शौर्यगाथा थक्क करणारी आहे. मोटार चालवण्याचे विक्रम तर तिने केलेच; परंतु तेवढ्यावर ती थांबली नाही. आपल्या या ड्राईव्हिंग मोहिमेला तिने विचाराच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पहिल्यांदा जेव्हा तिने ३२ देशांतून ३५ हजार किलोमीटरचा प्रवास केला तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतातील १०० कर्तृत्ववान महिलांमध्ये भारूलताचा समावेश केला असून राष्ट्रपती पदकाने तिचा सन्मान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिचा सन्मान केला आहे. भारूलताने शिक्षणावर भर देऊन लंडन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. नंतर बॅरिस्टर झाली. महाराष्ट्रातील महाडस्थित शल्यविशारद डॉ. सुबोध कांबळे यांच्याशी विवाह केला.
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना दोन मुलांचे पालनपोषण आणि शिक्षणावर अधिक भर दिला. तिचा प्रत्येक निर्णय हा निर्धारपूर्वक घेतलेला असतो. तिने जेव्हा ३५ हजार किलोमीटरचा प्रवास एकटीने केला, तेव्हा ऊन्ह, वारा, हिमवादळे, विस्तीर्ण वाळवंटे, माणसांचा मागमूस नसलेलेले प्रदेश, वाटेतील डोंगरदऱ्या पार करीत तिने जागतिक विक्रम केला. त्याची नोंद ‘गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॅार्डमध्ये नोंद झाली आहे. यावेळी भारतभ्रमण करताना देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करताना युवापिढीला देशभक्तीचा संदेश देणार आहे. कानाकोपऱ्यातून लोकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले आहे. तरुण पिढीला स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची जाणीव व्हावी, हा उद्देश आहे. ‘टीम अॅाफ मम अँड टू किडस्’ असे या मोहिमेचे नाव आहे. भारूलताच्या या अभियानाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समर्थन आणि सहकार्य दिले आहे.