गौसखान पठाण
सुधागड-पाली : अवकाळी पावसामुळे उत्पादन घट झाली असल्याने जिल्ह्यात कडधान्यांचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी ९० ते १०० रुपये किलो मिळणारे वाल यंदा १३० रुपये किलोने मिळत आहेत. निडी येथील गावठी वालदेखील किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वाढले आहेत.
जिल्ह्यात कडधान्यांमध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास चार हजार ३८१ हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. त्यानंतर मुग, मटकी, चवळी, तूर आदी कडधान्यांची लागवड केली जाते. ग्राहकांची गोड व कडवे वाल, लहान चवळी आणि निडीच्या वालांना अधिक पसंती आहे. पावसाळ्यासाठी खेड्यापाड्यासह शहरातील अनेकजण या कडधान्यांची खरेदी करतात. त्यात गावठी कडधान्यांना अधिक पसंती आणि मागणी असते. बाजारात किरकोळ व घाऊक दरात कडधान्य उपलब्ध आहेत.
वालाने खाल्ला भाव
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कडधान्य पिकांचे खूप नुकसान झाले. परिणामी यंदा वालाचे उत्पादन कमी झाल्याने भाव वधारले आहेत.
निडीच्या वालांना शहरी ग्राहकांची मागणी
निडी गावचे रुचकर, स्वादिष्ट व मोठ्या वालाच्या शेंगा प्रसिद्ध आहेत. याच्या टपोऱ्या वालांना शहरातील ग्राहकांची अधिक पसंती असते. मात्र स्थानिक लोक छोट्या गावठी वालांना पसंती देतात, असे विक्रेते भद्रेश शहा यांनी माहिती देताना सांगितले.
सध्या बाजारात ग्राहकांची कडधान्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे. गावठी कडधान्यांना अधिक मागणी असते. अवकाळी पावसामुळे उत्पादन घातल्याने यावर्षी कडधान्यांचे भाव मात्र
वाढले आहेत. – भद्रेश शहा, घाऊक व किरकोळ कडधान्य विक्रेते, पाली
दरवर्षी पावसाळ्याच्या आधी गावठी कडधान्य विकत घेतो. यंदा भाव जास्त आहेत. शहरातील नातेवाइकांना आवर्जून भेट म्हणून कडधान्ये पाठवतो. – लता माळी,गृहिणी, पाली