Friday, May 9, 2025

ठाणे

सरकारने एसटी कामगारांचे शोषण केल्याने सत्ताधारी असलेल्या पवारांच्या पक्षाने विचार करावा

सरकारने एसटी कामगारांचे शोषण केल्याने सत्ताधारी असलेल्या पवारांच्या पक्षाने विचार करावा

ठाणे (प्रतिनिधी) : या सरकारने एसटी कामागरांचे शोषणच केले आहे. शरद पवार हे सत्तेत नाही, तर शरद पवार यांचा पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी याचा विचार करावा, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात लगावला आहे. कोणाच्याही घरावर हल्ला करणे चुकीचेच असून याचा आम्ही निषेधच करतो, मात्र एसटी कामगारांची कोर्टात ज्या पद्धतीने बाजू मांडायला पाहिजे होती तशी बाजू मांडली गेली नाही.


दरम्यान, कोर्टाने कामावर रुजू होण्याची एक संधी दिली आहे, त्यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी एसटी कामगारांना यावेळी केली.


ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता जोतिराव फुले जयंती महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतन नाट्यगृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, तेव्हाच भूमिका आम्ही मांडली होती की, तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका. आता कोर्टाने संधी दिली आहे, उर्वरित प्रश्न नंतर सोडवता येतील. मात्र आता कामावर रुजू होण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.


शिवनेरीच्या मार्फत ज्यावेळी खासगीकरण झाले तेव्हाच लढा द्यायला हवा होता, मात्र संपबाबत कोर्टात योग्य बाजू मांडली असती, तर जेवढे अभय कोर्टाने दिले आहे त्यापेक्षा आणखी अभय दिले असते, असेही आंबेडकर म्हणाले.


बेरोजगार महागाईचे मुद्दे लपवण्यासाठीच दंगली


मनमोहन सिंग यांच्या काळात एवढी महागाई वाढली नव्हती. पेट्रोल-डिझेलचे दरही ८० रुपयांच्या वर गेले नव्हते. मात्र आजच्या घडीला महागाई बोकाळली असून त्यामुळेच हिंदू-मुस्लीम दंगली घडवल्या जात असल्याचा आमचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले.


सदावर्ते यांच्यावरही केली टीका


वकिलांनी केवळ कोर्टात आपली बाजू मांडायची असते, रस्त्यावर बाजू मांडायची नसते. नेते आणि वकील अशा दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावता येत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.


राज यांच्या सभेनंतर उत्तर देणार


हनुमान चालीसा व मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत जे राजकारण सुरू आहे त्यावरून उद्या (मंगळवारी) राज ठाकरे यांच्या सभेनंतरच आपण उत्तर देऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment