मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देतानाच मुंबईतील पर्यावरणाची जोपासना करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावणविषयक कामांची दखल आता थेट संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने घेतली आहे.
या संस्थेने ‘वृक्ष नगरी’अर्थात ‘Tree City३चा ‘वर्ष २०२१’साठीचा बहुमान आपल्या मुंबईला घोषित केला आहे. हा असा बहुमान मिळवणारे मुंबई हे देशातील दुसरे शहर ठरले आहे. या गौरवामुळे ‘स्वप्न नगरी’ अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहराला आता ‘वृक्ष नगरी’ अशी एक नवी ओळख मिळाली आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी पार पडलेल्या एका विशेष बैठकी दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंह चहल आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीतील ‘अरबोर डे फाऊंडेशन’ यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मानपत्राची प्रत दिली आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक कामांचे कौतुक केले.