भाईंदर ( वार्ताहर) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑगस्ट महिन्यातच होणार असून या निवडणुकीच्या कामी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज रहावे, असे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी आज वरिष्ठ अधिकार्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेची मुदत २७ ऑगस्ट रोजी संपत असून आगामी सार्वत्रिक निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने होणार आहे. या त्रिसदस्यीय प्रभागासंदर्भातील प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. महापालिका क्षेत्रात या वेळी प्रभागांच्या संख्येत वाढ झाली असून १०६ प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्च बांधणीला सुरुवात केली आहे.
शहरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महाआघाडी होण्याची सूतराम शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे या शहरात प्रत्येक प्रभागांमध्ये चौरंगी अथवा पंचरंगी सामना होण्याची सर्वाधिक चिन्हे दिसत आहेत. सध्या महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपाचे ६१ नगरसेवक, शिवसेनेचे २२ आणि काँग्रेसचे १२ असे संख्याबळ आहे.
इतर मागासवर्गीय आरक्षणामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार या पालिकांच्या निवडणुका काही काळापुरत्या पुढे ढकलल्या आहेत. मात्र हा वाद येत्या काही दिवसांतच संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने मीरा-भाईंदर मनपाची निवडणूक ऑगस्ट महिन्यातच होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत मनपाची निवडणूक ऑगस्ट महिन्यातच होईल, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने निवडणुकीच्या कामाकरीता सज्ज रहावे, असे आदेश सर्व संबंधित अधिकारी वर्गाला दिले आहेत.