मुकुंद रांजाणे
माथेरान : समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी सर्वांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजी घेणे व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. पेणकर पाड्यात प्रथमच तुमच्या ध्येयांना मार्ग दाखवणारे सेमिनार प्रेम लक्ष चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्रेमा लक्ष्मण विद्यालय यांच्या वतीने पेणकर पाडा येथे आयोजित करण्यात आले होते.
मानसिक आरोग्य ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. शेट्टी म्हणाले की, तणाव हा दोन प्रकारचा असतो. दैनंदिन काम करतांना थोडा ताण असला म्हणजे माणूस काम गांभीर्याने करतो; परंतु तोच ताण थोडा जास्त वाढला की, त्यामुळे आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. ताणतणावाचे व्यवस्थापन करतांना आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या टाळाव्यात. तसेच त्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या परिस्थीतीनुसार कशा प्रकारे जुळवून घेता येईल याबाबत विचार करावा, असे ते म्हणाले.
या दरम्यान प्रेमलक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हरेश गावंड, कार्याध्यक्ष दीपेश गावंड, मनजीत कौर, मुख्यध्यापिका पदमीनी भोईर, रूपाली राऊत, मुख्यध्यापिका प्रणीता गावंड, डॉ. यामिनी गावंड, डॉ. कमल काबरा, कानल रावल, श्रद्धा नारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान प्रेमा लक्ष्मण विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिबिराअंती विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून या मार्गदर्शन शिबिराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
बदलत्या जीवनशैलीमुळे आज प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तणावाला तोंड द्यावे लागत आहे. छोट्यांपासून
वृद्धांपर्यंत प्रत्येकजण आज तणावाखाली दिसत आहेत. ते चित्र बदलण्यासाठी सेमिनार आयोजित करण्यात आले, असे प्रेमलक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष दीपेश गावंड यांनी सांगितले.