ठाणे ( प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी असला तरी जून महिन्यात शालेय खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी लोकांनी खरेदी सुरू केली आहे; परंतु महागाईमुळे शालेय साहित्याच्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे.
मागील दोन-अडीच वर्षे कोरोना काळात गेल्याने शिक्षणाचा पार खेळखंडोबा झाला. ऑनलाइन स्कूलमुळे पालकांवर अतिरिक्त मोबाइल आणि लॅपटॉप खरेदीचा भार पडला. तर आता कोरोना निर्बंध उठवून शाळा नियमित सुरू झाल्या असताना हे शैक्षणिक वर्ष संपता संपता नवीन वर्ष सुरू होण्याच्या सुरुवातीलाच पालकांचे आर्थिक कंबरडे चांगलेच मोडणार आहे. चीनच्या साहित्यांवर बंदी आल्याने भारतीय बनावटीच्या शैक्षणिक साहित्यांच्या किमतीत आगामी शैक्षणिक वर्षात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. तर अनेक शाळांनी फीमध्येही १५ टक्के वाढीचा निर्णय घेतल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
दररोजच्या इंधन दरवाढीने वाहनचालकांसह गृहिणीही त्रस्त आहेत. भारतात चीनच्या मालावर बंदी असल्याने भारतीय बनावटीचे शालेय साहित्य घेणे आवश्यक बनले आहे. मात्र कच्चा मालांच्या वाढत्या किमती, ट्रान्सपोर्टचा खर्च आणि इंधन दरवाढीचा फटका आता शालेय साहित्यांनाही बसला आहे. ५० रुपयांना मिळणारी साधी कंपासपेटी आता ७० ते ८० रुपयांना मिळत आहे. खोडरबर ते शॉर्पनरही २ वरून ५ रुपयांवर आले आहे. नोटबुक १०० रुपये डझनवरून दीडशे रुपये डझन भावाने होलसेल बाजारात उपलब्ध आहेत.
चित्रकलेसाठी लागणारा साधा ब्रश दात घासण्याच्या ब्रशच्या किमतीपेक्षा महागला आहे. साधा ब्रश २० रुपयांवरून ३५ ते ४० रुपयांना मिळत आहे. पेनचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढले आहे. क्राफ्ट कलेसाठी लागणारे आर्ट पेपर, कलर पेपर आणि इतर साहित्यांच्या किमतीही ५ ते १० रुपयांनी वाढल्या आहेत. तर प्रिंटआउट, झेरॉक्स व इतर लिखाणासाठी लागणारा ए/४ कागदाचा बॉक्सही २४० रुपयांवरून ३०० ते ३५० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे प्रिंटआउट व झेरॉक्सच्या दरातही वाढ होणार असल्याचे काही व्यापार्यांनी सांगितले.
दरम्यान एकीकडे शैक्षणिक साहित्यांच्या किमती वाढत असताना ठाण्यातील काही शाळा व्यवस्थापनांनी १५ टक्के फी वाढीचा निणर्य घेतला आहे. तसे स्पष्ट निर्देशच पालकांना नोटीसीद्वारे दिले आहेत. गेली दोन अडीच वर्षे कोरोना काळात अनेकांचा रोजगार बुडाला. नोक-या गेल्या, काही विद्यार्थ्यांनी पालकही गमावले.
कोरोना काळात खुप मोठा आर्थिक फटका बसला असतानाही अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची पूर्णपणे फी वसुलीही केली. मात्र आता नवीन शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी वाढीचा निर्णय घेतल्याने पालकांनी मुलांना शिकवायचे कसे? असा सवाल उपस्थित केला आहे. शाळांच्या फी वाढीबाबत पालक संघटनांकडून कोणताच निणर्य घेतला नसल्याने याबाबत पालक अनभिज्ञ आहेत. तर शासनाचे कुठेच धोरण नसल्याने पालकामंध्ये संभ्रमावस्था आहे.