मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिले स्वयंचलित रोबोटिक आर्म सर्जरी केंद्राचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. मुलुंड येथील अदिती रुग्णालयाचे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. शैलेंद्र पाटील यांनी हे क्युविस रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सिस्टम सुरू केली आहे. सांधे व गुडघेदुखीची समस्या उद्भवणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या वाढतेय. यातील बऱ्याच रुग्णांना गुडघे प्रत्यारोपणाची गरज भासते, अशा स्थितीत रोबोटिक तंत्राद्वारे गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया करणं हे रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरतेय. रोबोटिकच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांना कमी वेदना जाणवते आणि रुग्ण पटकन बरा होतो. याशिवाय शस्त्रक्रियेत कोणतीही गुंतागुत न जाणवता त्यातील अचूकता साधता येते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी बराच वेळ लागत होता. पण आता रोबोटिक तंत्राद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येत असल्यानं रुग्ण लवकर बरा होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात नवीन अत्याधुनिक गोष्टी येत असल्याने याचा रुग्णांना नक्कीच फायदाच होणार आहे. डॉ. शैलेंद्र पाटील म्हणाले की, ‘‘मुंबईत पाच हजारांहून अधिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची हालचाल ही गुडघ्याच्या सांध्यावर अवलंबून असते.
संधिवातामुळे होणारी सांधेदुखी हे अपंगत्वाचे प्रमुख कारण आहे. ऑस्टियोआर्थरायटिस या आजारातही गुडघ्याचे सांधे झिजतात.” गुडघ्याचे सांधे झिजल्याने शरीर हालचाली मंदावते; परंतु गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंर रुग्ण पुन्हा नव्याने आपण आयुष्य जगू शकतो. पूर्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला त्रास व्हायचा; परंतु आता अशा स्थितीत आता क्युविस रोबोटिकसारखे एक नवीन तंत्र विकसित करण्यात आले आहे. या तंत्राद्वारे गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे रुग्णांसाठी एक वरदान ठरत आहे.