कोलंबो : श्रीलंकेत डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या लोकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यपदार्थांसह अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोक आता दागिने विकून पैसे उभे करत आहेत, त्यामुळे सोन्याची खरेदीही ७० टक्के घटली आणि दर तब्बल एका तोळ्याला २ लाख ३७ हजार रुपयांवर पोहचला आहे.
दैनंदिन वापराच्या वस्तू घेण्यासाठीही लोकांना सोन्याचे दागिने विकावे लागत असल्याचे व्यापारी सांगितात. लोकांकडे खाण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे ते सोने विकत आहेत. आपलं सोने गहाण ठेवण्याची परिस्थिती लोकांवर यापूर्वी कधीही आली नव्हती.
श्रीलंकेची अर्थव्यवस्था स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. श्रीलंकेवर चीन, जपान, भारत आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचे मोठे कर्ज आहे. पण परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे ते कर्जाचा हफ्ताही भरु शकत नाहीत. त्याचवेळी, श्रीलंकन रुपया हे सर्वात कमकुवत कामगिरी करणारं चलन बनले. शनिवारी (९ एप्रिल) श्रीलंकन रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३१५ च्या स्तरावर पोहोचला होता, जो निचांकी आहे.